Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मतदार याद्यांमध्ये ठराव पाठवण्यासाठी अल्प प्रतिसाद; जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांकरिता निवडणूक होत आहे. संचालक पदाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींचे ठराव मागवण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा बँकेच्या मतदार याद्यांमध्ये ठराव पाठवण्यासाठी जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत आहे.

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या 21 जागा असून विविध कार्यकारी संस्था (सोसायटी) गटातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 15 प्रतिनिधी, उर्वरित हाऊसिंग सोसायटी, नागरी बँका, बिगरशेती पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, मजूर संस्था, खरेदी-विक्री संघ, दूध संघ, वैयक्तिक सभासद, कुक्कुटपालन व इतर संस्था यांचा एक प्रतिनिधी तसेच राखीव गटातून 5 प्रतिनिधी निवडून येत असतात. महिला प्रतिनिधीकरिता 2, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य 1, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गातील सदस्य 1, इतर मागासवर्गातील सदस्य (ओबीसी) 1 याप्रमाणे निवड होत असते.

जिल्हा बँकेच्या अंदाजित 9500 संस्था मतदानास पात्र असून 1145 विविध कार्यकारी संस्था आहेत. उर्वरित 8300 संस्था या हाऊसिंग सोसायटी, नागरी बँका, पतसंस्था, मजूर सोसायटी, खरेदी-विक्री संघ, दूध संघ, कुक्कुटपालन व इतर संस्था तसेच वैयक्तिक सभासद आहेत. मतदानासाठी संस्थेच्या प्रतिनिधीचा ठराव तालुक्यातील सहाय्यक निबंधक/तालुका उपनिबंधक यांच्याकडे पाठवण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी असून संस्थांनी संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक/तालुका उपनिबंधक कार्यालायातून ठरावाचा विहित नमुना व कार्यपद्धती समजावून घेऊन त्यानुसार संस्थेच्या प्रतिनिधित्वाचे ठराव तालुक्यातील सहायक निबंधक/तालुका उपनिबंधक कार्यालायात जमा करावयाचे आहेत. यासंदर्भात 18 डिसेंबर 2019 रोजी संस्था सभासदांचे ठराव मागवण्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आलेले आहे. मात्र बर्‍याच संस्थांनी अद्यापही ठराव तालुका निबंधक कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!