जिल्हा बँकेची भानसहिवरा शाखा फोडली; लॉकर फोडण्यात अपयश

0
दरोडेखोरांचा माग काढताना पथकातील श्‍वानउसाच्या शेतात आढळून आलेले गॅसकटर

कॉम्प्युटर व सीसीटीव्हीची हार्डडिस्क चोरली; श्‍वानाने काढला एक किलोमीटरपर्यंत माग

भानसहिवरा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडून लुटण्याचा प्रयत्न शनिवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी केला. बँकेतून 36 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही सिस्टीम हार्डडिस्क व कॉम्प्युटर हार्डडिस्क असा 36 हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला असला तरी सुदैवाने आर्थिक चोरी करण्यात त्यांना अपयश आले. गॅसकटरसह आलेल्या या चोरट्यांचा श्‍वानपथकाने एक किलोमीटरपर्यंत माग काढला.
भानसहिवरा येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शाखा फोडण्याचा प्रयत्न अज्ञात दरोडेखोरांनी केला. बँकेचे बाहेरील कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला. बँकेत प्रवेश करण्यापूर्वी दरोडेखोरांनी प्रथम फोन व सायरनच्या वायर तोडून टाकल्या. शनिवारी मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी बँकेच्या मागील बाजूचे गेट तोडून आत प्रवेश केला.
तसेच लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने बँकेतील सीसीटीव्ही कॅमेेरे व डीव्हीडी घेऊन दरोडेखोर पसार झाले. या घटनेमध्ये आर्थिक चोरी झाली नसली तरी संगणकाची हार्डडिस्क व कॅमेर्‍याची हार्डडिस्क मात्र दरोडेखोर सोबत घेऊन गेले.या गुन्ह्याच्या तपासासाठी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. श्‍वानाने बँकेपासून एक किलोमीटरपर्यंत माग दाखविला. तसेच जवळीलच विश्‍वनाथ चव्हाण यांच्या उसाच्या शेतामध्ये गॅसकटर आढळून आले.
याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक देविदास पानसरे (रा. देवगाव, ता. नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे, की 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी बँकेचे कुलूप तोडून व आत प्रवेश करून 20 हजार रुपये किमतीची कॉम्पुटर हार्डडिस्क व 16 हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही सिस्टीम हार्डडिस्कसह असा 36 हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या. लॉकर तोडण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 457, 380 व 511 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल श्री. पवार करीत आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*