जिल्हा बँकेने वितरीत केले 2 लाख फॉर्म

0

कर्जमाफी : शेतकर्‍यांना मदत करण्याचा बँकेचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने 2 लाख फॉर्म (अर्ज) छापून घेतले आहेत. या अर्जाचे वितरण गावपातळीवर कर्जदार शेतकर्‍यांपर्यंत करण्यात आले असल्याची माहिती बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

कर्जदार शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या अर्जातील माहिती लेखी भरून तसेच त्यासमवेत आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर या अर्जांच्या आधारे शेतकर्‍यांना ऑनलाइन माहिती भरणे सोपे होणार आहे.
अर्थात आता ऑनलाइन अर्ज भरण्याची अट सरकारने काढून टाकली असल्याने या भरलेल्या लेखी अर्जांच्या आधारेच जिल्हा बँकेला शेतकरी कर्जमाफीचा लाभ शेतकर्‍यांना देणे शक्य होणार आहे.
शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर सरकारने शेतकर्‍यांनी भरून द्यावयाच्या दोन पानी घोषणापत्राचा नमुना राज्यातील सर्व जिल्हा बँकांना कळवला आहे.

यासमवेत ऑनलाइन पद्धतीने कर्जमाफीचा अर्ज कसा भरायचा, याचे सविस्तर विवरण असलेले 15 पानी सूचनापत्रक आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना ऑनलाइन माहिती भरण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता असल्याने त्यांना सोयीचे जावे म्हणून नगर जिल्हा सहकारी बँकेने हा दोन पानी फॉर्मच छापून घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात असे 2 लाख फॉर्म छापले गेले असून, त्यांचे वितरण बँकेच्या जिल्हाभरातील 286 शाखा तसेच तालुका विकास कार्यालयांद्वारे गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा संस्थेपर्यंत करण्यात आहे. या संस्थांद्वारे हे अर्ज प्रत्यक्ष शेतकर्‍यांना देणार असून, त्यावर त्यांच्या कर्ज थकबाकीची माहितीही त्यांच्याकडून भरून घेतली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे तसेच कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला आधार क्रमांक,पॅन क्रमांक, पेन्शन पीपीओ क्रमांक, कर्जखाते पुस्तिका, बँकेचे पासबुक यांच्या मूळ व झेरॉक्स प्रती समवेत घेऊन सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, सेतू कार्यालय वा ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कार्यालयातून ऑनलाइन माहिती भरण्याचे मार्गदर्शनही त्यांना केले जाणार आहे.

  दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आदेशानूसार पिक विमा भरून घेण्यासाठी रविवारी बँकेच्या 286 शाखा आणि 10 विस्तारीत कक्ष सुरू असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*