जिल्ह्यात 130 कोटींची तूर खरेदी

0

22 हजार 355 शेतकर्‍यांना फायदा

अहमदनगर (प्रतिनिधी)- नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून जिल्ह्यात 22 हजार 355 शेतकर्‍यांकडून दोन लाख 55 हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. यापोटी शेतकर्‍यांना सरकारच्या आधारभूत किंमतीनुसार 129 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.
साधारण 22 डिसेंबर 2016 पासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेड यांच्याकडून रडतखडत तूर खरेदीला सुरूवात झाली. यासाठी 9 ठिकाणी तूर खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली. कधी बारदाना नाही, तर खरेदी केलेली तूर कोठे ठेवायची यावरून शेतकरी विरोधात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असा संघर्ष पाहावायास मिळाला. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात 22 हजारहून अधिक शेतकर्‍यांची हमी भावानुसार तूर खरेदी झालेली आहे.
जिल्ह्यात तूर खरेदीसाठी नगर, जामखेड, पारनेर, मिरजगाव (कर्जत), शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, वांबोरी(राहुरी) या ठिकाणी स्वतंत्रपणे खरेदी केेंद्रे सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी 22 एप्रिल अखेर 19 हजार 351 शेतकर्‍यांची दोन लाख 21 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. या तुरीची किंमत 111 कोटी 61 लाख रुपये आहे.
राज्य सरकारने तूर खरेदी बंद केल्यानंतर केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत 19 ते 28 मे पर्यंत एक हजार 908 शेतकर्‍यांची 20 हजार 733 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. याची किंमत 10 कोटी 47 लाख रुपये एवढी आहे. त्यानंतरही जिल्ह्यात नगर, जामखेड, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी, नेवासा या ठिकाणी 13 हजार 562 क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. त्याची किंमत सहा कोटी 84 लाख रुपये आहे.सध्या केंद्र सरकारच्या आदेशानुसार तूर खरेदी सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

 पाथर्डी येथील तूर खरेदीत काहीही घोटाळा झालेला नाही. मात्र, तूर खरेदी केल्यानंतर ती पुण्याला पाठवत असताना काही तांत्रिका चुका पाथर्डी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून झालेल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांना नोटीस देण्यात आली असून लवकरच त्यांचा खुलासा येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*