Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आणखी 3 दिवस पावसाचे संकट

Share

हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी राजा चिंतेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उद्या 23 ऑक्टोबर रोजी पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्ग हबकून गेला आहे. दरम्यान, काल मंगळवारी रात्री अकोले, नगर व अन्य तालुक्यात रिपरिप सुरू होती. अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात 27 ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचं हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. उद्या 23 ऑक्टोबर रोजी पुणे, नगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कश्यपी यांनी वर्तवली आहे. पुण्यात उद्या एक ते दीड तास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई,पुणे,शिरूरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना अडचणींशी सामना करावा लागला. नगर जिल्ह्यातही चारपाच दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने शेतकरी वैतागून गेला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे बाजरी आडवी झाली आहे. मकाच्या कणासात पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. तर ज्याठिकाणी कापसाचे बोडं फुटली आहेत. तेथे कापसाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी साठवलेला कांदा भिजला आहे. अन्य भाजीपाला आणि फुलशेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यात आणखी तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्‍यांपुढची चिंता वाढली आहे.

मुळाचे 11 दरवाजे उघडले, मांडओहळही ओव्हरफ्लो

पाणलोटात पाऊस सुरू असल्याने काल मुळा धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून रात्री 9 वा. 2200 क्युसेकने मुळा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हरिश्चंद्र गड परिसरात पाऊस होत असल्याने कोतूळ येथून मुळा नदी 500 क्युसेकने वाहती आहे. तसेच पारनेर व अन्य भागातून 1700 क्युसेक अशी एकूण 2200 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. यापूर्वी 300 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. 26000 दलघफू क्षमतेचे हे धरण 100 टक्के भरले असल्याने येणारे पाणी पुन्हा धरणातून सोडण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारे 399 दशलक्ष घनफूट क्षमतेचे मांडओहोळ धरण मंगळवारी सकाळी तुडूंब भरले. गेल्या अनेक वर्षांनंतर हे धरण भरले.

भंडारदरातही पाऊस, भातपिकांचे प्रचंड नुकसान

भंडारदरा (वार्ताहर)- भंडारदरा धरण पाणलोटात सायंकाळी पावणे पाच वाजल्यापासून रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे धरणात नवीन पाण्याची आवक वाढली असल्याने रात्री 8 वाजता विद्युतगृह क्र. 1 मधून 814 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. भंडारदरा पाणलोटात पावसाने मुक्काम ठोकल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांपुढे संकट उभे राहिले आहे. या भागातील लहानमोठे तलाव, बंधारे भरले असल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. प्रवरा नदीतही पाणी आहे.

पिकांचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी
गेल्या चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात मुक्काम केला आहे. अनेक मंडलांत दोन इंचापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे काढणीला आलेली बाजरी, मका आणि अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी वैतागला आहे. या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी व दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!