Type to search

Featured सार्वमत

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, पिकांना नवसंजीवनी

Share

नगरमध्ये 4 इंच नोंद, सलग तिसर्‍या दिवशी अकोलेत हजेरी, भंडारदरात जोर वाढला

अहमदनगर (प्रतिनिधी) – शनिवारी दुपारी नगर शहर आणि उपनगरात पावसाने दणकाच दिला. सुमारे दोन तासांत अतिवृष्टीमुळे अख्खे शहरच जलमय झाले. रविवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या पावसाच्या आकडेवारीत नगर शहर आणि तालुक्यातील दहा महसूल मंडलांपैकी 7 मंडलात एक ते सव्वा दोन इंच पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद सावेडी मंडलात 117 मि.मी झाली आहे. नेवाशात 80 तर श्रीगोंद्यात 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी सुखावला आहे. दरम्यान काल सलग तिसर्‍या दिवशीही अकोलेत जोरदार पाऊस झाला.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. जिल्ह्यात पेरण्यानंतर पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, शनिवारपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. असे असले तरी जिल्ह्याला वरदान असणार्‍या अकोले तालुक्यात पावसाचा जोर कमीच आहे. यामुळे धरणात नव्याने दाखल होणार्‍या पाण्याचा वेग मंद आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नगर शहरात शनिवारी झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. शहरातील बाजारपेठीत रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

पावसाच्या पाण्यात शहरातील दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा वाहून जातांना दिसल्या. सखल भागात राहणार्‍या अनेकांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजलेले दिसले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारी नगर शहरातील सावेडी मंडलात 117, नालेगाव (शहर) 108, केडगाव 52, चास 59, भिंगार 80, नागापूर 82, वाळकी 55 आणि चिचोंडी पाटील 56 मि.मी ऐवढ्या पावसाची नोंद झालेली आहे. अवघ्या दोन तासात ऐवढा पाऊस बरसल्याने शहरात अनेक भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्याच्या उर्वरित भागात नेवासा (खुर्द) 80, नेवासा बुद्रुक 52, वडाळा 58, वाडेगव्हाण (पारनेर) 82, श्रीगोंदा 55, राशिन 53, उंदिरगाव 50, वांबोरी 76, ब्राम्हणी 54, टाकळीमियाँ 56 ऐवढ्या पावसाची नोंद रविवारी झाली आहे.

19 मंडळांत 200 मि.मी. पेक्षा अधिक
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसात 19 महसूल मंडळात 200 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. यात नेवासा 272, नगर (नालेगाव) 203, सावेडी 226, वाडेगव्हाण 262, सुरेगाव 228, साकीरवाडी 499, वीरगाव 249, कोतुळ 344, समशेरपूर 327, ब्राम्हणवाडा 291, शेंडी 1 हजार 253, राजूर 367, अकोले 485, संगमेनर 227, धांदरफळ 273, श्रीगोंदा 247 कोळगाव 274 आणि जामखेड 209 यांचा समावेश आहे.

सर्वात कमी ताराहाबादला
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस राहुरी तालुक्यातील ताराहाबाद महसूल मंडलात अवघा 38 मि.मी. झाला आहे. तसेच बेलापूर (श्रीरामपूर) 43, पळशी (पारनेर)45 आणि मिरी (पाथर्डी) 42 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

हवामान खात्याच्या मुंबई विभागाने आज (सोमवारी) नगर जिल्ह्यात वादळी वारा आणि वीजांच्या कडकटांसह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी वीजांपासून संरक्षण व्हावे, यासाठी पाऊस सुरू होताच संरक्षीत ठिकाणी थांबावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

यंदा वरुणराजाची अकोले, नेवासा, श्रीगोंद्यावर जादा मेहरबानी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा वरुणराजाने अकोले, नेवासा आणि श्रीगोंदा या तालुक्यांवर अधिक मेहरबानी केल्याचे पाटबंधारेच्या उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. गतवेळी अकोले तालुक्यात सरासरीच्या 78 टक्के पाऊस झाला होता. पण यंदा त्याने शंभरीपर्यंत मजल मारली आहे. नेवाशात गतवेळी 28 टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र ही आकडेवारी 51 टक्क्यांवर गेली आहे. श्रीगोंद्यातही गतवेळी केवळ 35 टक्के पाऊस पडला होता. यावेळी 55 टक्केवारी झाली आहे.

डिंभेतील पाणीसाठा 4446 दलघफू
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या धरणांमध्येही पाण्याची आवक मंदावली आहे. डिंभे धरणातील पाणीसाठा 4446 दलघफू झाला आहे. माणिकडोहचा 1638 दलघफू पाणीसाठा झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!