Type to search

Featured सार्वमत

जिल्हा विभाजनावरून मतभिन्नता

Share

ना.शिंदेंना पुन्हा घाई । खा.विखेंसाठी जलसिंचन प्राथमिकता

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा विभाजनाच्या विषयावर पालकमंत्री राम शिंदे साडेचार वर्षांपूर्वी होते, तेवढेच आग्रही असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांचे पक्षसोबती खा.डॉ.सुजय विखे यांनी विभाजनाला सहमती दर्शविली असली तरी विभाजनावर खर्च होणार्‍या निधीत जलसिंचनाचे मोठे काम उभे करता येईल. त्याचा जनतेला अधिक फायदा होईल, याकडे लक्ष वेधून जिल्हा विभाजनावरून मतभिन्नतेची घंटी धीम्या आवाजात वाजवली आहे.

गेले साडेचार वर्षे पालकमंत्री शिंदे जिल्हा विभाजनाचा मुद्दा वारंवार मांडत आले आहेत. आता विधानसभा निवडणुका तोंडावर असताना त्यांनी पुन्हा एकदा हा विषय छेडला आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा विभागाचा विषय उपस्थित केल्यानंतर ते होणारच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. नगर जिल्ह्याचे विभाजन लवकरच केले जाणार आहे. विभाजन केल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते असावे, हा प्रश्न देखील आता निकाली निघाला आहे, असे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा विभाजनाबाबत मी स्वतः आग्रही असून, विभाजन झाल्यास दोन्हीकडे चांगल्या पद्धतीने कामे होतील. प्रशासकीय दृष्टीने ते सोयीचे होईल. जिल्ह्याचा विभाजनाचा प्रश्‍न मार्गी लागावा, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत असल्याचेही शिंदे म्हणाले.

पालकमंत्र्यांनंतर खा. डॉ. विखे पत्रकारांना सामोरे गेले. जिल्हा विभाजनाबाबतच्या प्रश्‍नाला आधी बगल देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र याविषयावर पालकमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रीया दिल्याचे कळल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांच्या भुमिकेशी आपण सहमत असल्याचे सांगितले. मात्र जिल्हा विभाजनासाठी मोठा खर्च अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. हा निधी जलसिंचन कामावर खर्च झाल्यास नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल, असे आपले मत आहे. यामुळे जिल्हा विभाजनाबाबत पुनर्विचार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासमवेत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगीतले. मात्र माझा जिल्हा विभाजनाला विरोध नसल्याचेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

विखेंच्या समावेशाने आनंदच
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समावेशाबाबत विचारले असता नगर जिल्ह्याला आणखी एक मंत्री मिळतो, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीने आज दिलेल्या मान्यतांचे विषय् तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात अधिकार्‍यांना सांगितले असल्याचे सांगून, विधानसभा निवडणुकीपूर्वी यातील बरीचशी कामे मार्गी लागलेली असतील, असेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!