Type to search

Featured सार्वमत

जिल्हा बँकेतील नियुक्तीचा मार्ग मोकळा

Share

विभागीय सहनिबंधकांचा आदेश खंडपीठाकडून रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने 2017 मध्ये राबविलेल्या नोकर भरती प्रक्रियेची नाशिकच्या विभागीय सहनिबंधक यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी सहकार कायद्यातील तरतुदीचा आधार घेत जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया 2018 मध्ये रद्दबातल ठरवली होती. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकांवर सुनावणी होऊन शुक्रवार (दि.5) रोजी खंडपिठाने विभागीय सहनिबंधक भालेराव यांचे भरती रद्द करण्याचे आदेशच रद्द केले आहेत. यामुळे भरतीत पात्र ठरून अंतिम निवड यादीत समावेश असणार्‍या ‘त्या’ उमेदवारांच्या नियुक्तींचा मार्ग मोेकळा झाल्याची माहिती अ‍ॅड. राहुल कर्पे यांनी दिली. जिल्हा सहकारी बँकेने जुलै 2017 मध्ये बँकेत रिक्त असणारी पदे भरण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली होती. बँकेतील प्रथम श्रेणी अधिकारी पदाच्या सात, द्वितीय श्रेणी पदाच्या 63, ज्युनिअर ऑफीसर पदाच्या 236 आणि लिपिक संवर्गाच्या 159 जांगासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

सुरूवातीपासून ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवर्‍यात होती. भरतीसाठी नेमण्यात आलेली पुण्याची ‘नायबर’ या खासगी संस्थेच्या नेमणुकीवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, या आक्षेपला न जुमानता जिल्हा बँक प्रशासनाने नायबर या संस्थेकडे भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर भरतीसाठी लेखी परीक्षा झाली आणि पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. लेखी परीक्षेनंतर व्दितीय श्रेणी अधिकार्‍यांच्या 63 जागांसाठी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलवण्यात आले. यावेळी 53 उमेदवारांपैकी 50 उमेदवारांना बँकिंग क्षेत्राचा अनुभव नसल्याचे कारण पुढे करत डावलण्यात आले. या विरोधात सर्वप्रथम दै. सार्वमतमध्ये वृत्त प्रसिध्द होऊन भरती प्रक्रियेविषयी संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर विभागीय सहनिबंधक यांच्याकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी देखील 17 ऑक्टोबर 2017 ला भरतीसंदर्भात सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगर तालुका उपनिबंधक यांना दिले होते. त्याचा अहवाल विभागीय सहनिबंधक यांना मिळालेला नसताना अचानक जिल्हा बँकेने 27 तारखेला निवड झालेल्या उमेदवारांची अंतीम यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली होती. यात श्रेणी एकच्या अधिकारी पदासाठी एक उमेदवार, द्वितीय श्रेणीच्या पदासाठी तीन, ज्युनिअर ऑफिसर पदासाठी 236 आणि क्लार्कपदाच्या 146 उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले होते. दरम्यान विभागीय सहनिबंधक भालेराव यांनी सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 (1) अन्वये भरतीच्या चौकशीचे आदेश काढून त्यानंतर चौकशी अहवालानुसार 28 फेबु्रवारी 2018 ही भरती रद्द केली होती.

विभागीय सहनिबंधक भालेराव यांच्या आदेशाला निवड झालेल्या उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात न्यायमुर्ती गंगापूररवाला आणि न्यायमुर्ती अवचट यांच्या संयुक्त खंडपीठात आव्हान दिले होते. बँकेच्या भरतीसंदर्भात आठ याचिका दाखल झाल्या होत्या. यातील उमेदवारांची एक याचिका अ‍ॅड. वर्पे लढत होते. यावेळी झालेल्या सुनावणी दरम्यान पेपर कटिंगच्या आधारे भरतीची चौकशी झाली असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. यासह अन्य मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून त्या आधारे न्यायालयाने विभागीय सहनिबंधक भालेराव यांच्या भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश रद्द केले आहेत. तसेच विभागीय चौकशीत दोषी असणार्‍यांना बाजुला ठेवून उर्वरित उमदेवारांना क्लिनचिट ठरविले आहे. यामुळे आता बँकेने लिस्टव्दारे नियुक्त केलेल्या एक उमेदवार, द्वितीय श्रेणीच्या पदासाठी तीन, ज्युनिअर ऑफिसर पदासाठी 236 आणि क्लार्कपदाच्या 146 उमेदवारांपैकी 64 उमेदवार बाजूला ठेवून उर्वरितांचा नियुक्तींचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती अ‍ॅड. वर्पे यांनी दिली. या खटल्या बँकेच्यावतीने अ‍ॅड. आर. एन. धोर्डेे, उमेदवारांच्यावतीने स्वतः अ‍ॅड. वर्पे, अ‍ॅड. सुर्यवंशी, अ‍ॅड. ठोंबरे यांच्यासह अन्य वकीलांनी काम पाहिले.

‘त्या’ 64 साठी चौकशी समिती
विभागीय सहनिबंधक यांच्या चौकशीत भरतीत निवड होऊन बँकेने प्रसिध्द केलेल्या निवड यादीतील 422 उमेदवारांपैकी 64 उमेदवार हे बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकार्‍यांशी संबंधित आहेत. यामुळे या 64 उमेदवारांची येत्या सहा महिन्यांत नव्याने चौकशी समिती गठीत करून त्यांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. यामुळे सहकार खात्याला येत्या सहा महिन्यांत या 64 उमदेवारांचा प्रश्‍न निकाली काढावा लागणार आहे.

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!