जिल्ह्यात १५० मेगावॅट विजेचा तुटवडा

नाशकात दुपारी १ पर्यंत भारनियमन बंद 

0

नाशिक | दि. ७ प्रतिनिधी- नाशिकसह मोठ्या शहरांना भारनियमनातून वगळण्याची घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली खरी, मात्र जिल्ह्याला सुमारे १५० मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत असून नाशिक शहरासह ग्रामीण भागात भारनियमन करण्यात येत आहे.

ए ते डी गटात दुपारी १ वाजेपर्यंतचे भारनियमन बंद करण्यात आल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले असले तरी दुपारनंतर मात्र भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे शहराला भारनियमनातून वगळण्याची घोषणा फोल ठरल्याचेच दिसून येते.

जिल्ह्याला सध्या सुमारे १२०० मेगावॅट विजेची मागणी आहे. त्यापैकी सुमारे १०६० मेगावॅट वीज उपलब्ध होत असून सुमारे १५० मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे शहरात चार ते सहा तास तर ग्रामीण भागात १० ते १२ तासांचे भारनियमन सुरू करण्यात आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर सुरू झालेल्या या भारनियमनाने सर्वसामान्य नागरिकांची दैनंदिन कामेही ठप्प झाली असून, पाणीपुरवठा, स्वयंपाकघरातील कामे, मुलांच्या परीक्षा या सार्‍या अडचणींना गृहिणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात पुरेशी वीज आहे. त्यामुळे नाशिक शहरात भारनियमन होणार नाही, असे याअगोदरच महावितरणने कळवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातील पंचवटी, रविवार पेठ , भद्रकाली, द्वारका, जुने नाशिक, पुणे रोड, नाशिकरोड , सिडको, सातपूर, अंबड, इंदिरानगर भागात सातत्याने वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

या अघोषित भारनियमनामुळे नागरिक हवालदिल झाले असून, रात्री गरम होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी सकाळच्या सुमारास गृहिनींना घरकामात खोळंबा होत आहे. काही शाळांच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विजेअभावी अभ्यास करणे कठीण झाले आहे. तर ऐन सणासुदीच्या काळात होणार्‍या अघोषित भारनियमनामुळे व्यापारी वर्गही त्रस्त आहे. पुढील पंधरा दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचेही खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे.

पावसाने मागणी घटल्याचा दावा
पावसामुळे राज्यात विजेची मागणी कमी झाल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. शनिवारी राज्यात १६५०० मे.वॅ. इतकी विजेची मागणी होती. त्यापैकी १५७०० मे.वॅ. वीज उपलब्ध आहे. महावितरणने कराराव्दारे ७९०मे.वॅ. वीज खरेदी केली आहे. तसेच राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाउस सुरू असल्याने विजेच्या मागणीत घट झाल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. वीजपुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होउ नये, याकरिता कृषीग्राहकांच्या वाहिन्यावरील रात्रीची वीज उपलब्धता १० तासांवरून ८ तासांवर करण्यात आली आहे.

भारनियमनात सहभागी व्हा
ज्या भागात भारनियमन नाही अशा भागातील नागरिकांनी वीज सुरू असतानाही स्वतःहून दोन तास वीज वापर बंद ठेवावा, असे आवाहन राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी करत नागरिकांना स्वतःहून भारनियमनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वीज बचत करून जनतेने सहकार्य करण्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. तात्पुरत्या संकटाच्या काळात ऊर्जा बचत करणे हाच तूर्तास उपाय आहे. गरज नसताना विजेचा वापर टाळावा. घरात सर्व ठिकाणी एलईडी बल्ब/ट्यूबलाईटचा वापर करावा. आवश्यकता नसेल तर पंखे सुरू करू नयेत. गरज असेल तेव्हाच एअर कंडिशनचा उपयोग करावा. संकटाच्या काळात एसीचा वापर टाळल्यास बरे होईल. अशा उपाययोजना केल्या तर वीज बचत होईल व ज्या भागांना वीज मिळत नाही, अशा भागांना वीजपुरवठा करून त्या नागरिकांनाही भारनियमनाच्या संकटापासून दिलासा देणे शक्य होईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले.

शुक्रवारी जिल्ह्याची विजेची मागणी सुमारे १२०० ते १३०० मे.वॅ. होती. त्यापैकी जिल्ह्यात सुमारे ९५० मे.वॅ. वीज उपलब्ध होती. म्हणजेच सरासरी जिल्ह्याला ३५० मे.वॅ. विजेचा तुटवडा जाणवत असताना आज अचानक त्यात ५० टक्के तूट भरून निघाल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणकडून प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी जिल्ह्यात १५० मे.वॅ. विजेचा तुटवडा आहे. पावसामुळे मागणी कमी झाल्याने ही तूट भरून निघाल्याचे सांगण्यात आले. मात्र तरीही शहरात अधूनमधून विजेचा लंपडाव सुरू असल्याने महावितरणचा हा दावा कितपत खरा याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

LEAVE A REPLY

*