आपत्ती व्यवस्थापनच संकटात

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – गुरुवारी झालेल्या वादळी वार्‍याने नगर शहरातील महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचे पितळ उघडे पडले. शहरभर बेकायदा झळकणारे फ्लेक्स, वाढलेली झाडे, धोकादायक खांब, धोकादायक इमारती याकडे महापालिकेने दुर्लक्ष झालेले आहे. वादळात याचा मोठा फटका नगराच्या नागरिकांना बसला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी मनपा प्रशासनाचे कामकाजाचे या निमित्ताने पितळ उघडे पडले आहे. अशीच परिस्थिती पावसाळ्यात राहिल्यास नगरकरांना मोठ्या संकटाला समोरे जावे लागणार आहे.
गुरुवारी (25 मे) दुपारी नगर शहर, उपनगर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे वादळ झाले. या वादळाचा फटका बसून झाडे पडणे, विजेचे खांब पडणे, भव्य फ्लेक्स फलक फाटून वार्‍याने उडून पडले होते. चौपाटी कारंजा, कोठला, वसंत टॉकीज, गोविंदपुरा, सावेडीत गंगा उद्यानासह विविध परिसरात वादळाचा फटका बसला.
शहरात सध्या सर्वत्र बेकायदा फ्लेक्स झळकावण्याची स्पर्धा सुरू आहे. गुरुवारी चौपटी कारंजा भागात सायंकाळच्या वेळी रस्त्यावर गर्दीच्यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येउन फटाके उडवण्यात आले. यामुळे काही काळ नागरिकांना त्या ठिकाणी थांबावे लागले. अशी किती तरी उदाहरणे असून मनपा प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने बेकायदा फ्लेक्स लावणार्‍यांचे चांगलेच फावले जात आहे.
गुरूवारच्या वादळात अनेक भागात फ्लेक्स वार्‍याने उडून विजेच्या तारांवर पडले. त्यामुळे तारा तुटून वीजपुरवठा खंडीत झाला. महापालिकेकडून शहरात उभारल्या जाणार्‍या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई होत नाही, त्याचा परिणाम यावेळी नगरकरांना भोगावा लागला. यासह शहरभरात अनेक रस्त्यांवर झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत या झाडांच्या फांद्या सावलीचा आधार देतात. पण त्या किती धोकादायक आहेत, हे वादळी वारे आल्यानंतरच स्पष्ट झाले. त्यामुळे आता गांभीर्याने रस्त्यावरील झाडे व त्यांच्या फांद्या यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याची वेळ आली आहे.

 पावसाळा जवळ आला आहे. शहरातील सखल भागात दरवर्षी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात असते. मात्र, या पार्श्‍वभूमीवर मनपाकडून कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. शहरात अनेक ठिकाणी गटाराची प्रश्‍न आहे. यासह अनेक भागांत डे्रनेजसाठी रस्ते खोदण्यात आलेले आहे. हे काम काही दिवसांपासून सुरू असून संपण्याचे नाव घेत नाहीत. त्याच सुरुवातीला जोरदार पाऊस झाल्यास त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे.

LEAVE A REPLY

*