Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जाणून घ्या काय सांगतो कायदा?

नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू; जाणून घ्या काय सांगतो कायदा?

नाशिक | प्रतिनिधी

चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नाशिकमधील कोरोना कक्षामध्ये संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

काल दुबईहून आलेल्या करोना संशयित रुग्णांची तपासणी नाशिकमध्ये केली जात आहे. नाशिकसह पुण्यातही या रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी देशदूतशी बोलताना दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्ह्यात स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करुण पूर्ण वेळ तैनात ठेवण्यात येतील. याशिवाय संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र्य रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येईल. कोरोना विषाणू संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष, मदत केंद्राची स्थापना, जास्त भावाने मास्क वा औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

काय आहे कायदा?

  • याअंतर्गत सोशल मीडियातून चुकीच्या अफवा पसरविणार्यांवर योग्य ती कारवाई करणे
  • परिसरात परदेशी नागरिक आल्यास त्यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करणे
  • शासनाच्या नियमांप्रमाणे सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलणे किंवा रद्द करणे
  • कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना करणे, लघुकृती आराखडा तयार करणे
  • आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे तंतोतंत पालन करणे
  • वैद्यकीय पथके तयार करून ठिकठिकाणी ती तैनात करावीत
  • आवश्यक त्या स्थळी रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे
  • कोरोना साठी स्वतंत्र जिल्हा कक्ष व मदत क्रमांक जाहीर करणे
  • हे कक्ष २४ तास सुरु ठेवून याठिकाणी वेळोवेळी मदतीसाठी मनुष्यबळ नेमणे
  • राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक ०२० – २६१२७३९४ व टोल फ्री कॉल सेंटर ९१ ११ २३९ ७८०४६  ठेवण्यात आला असून याबाबत जनजागृती करणे.
  • जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत याबाबतची जनजागृती व्हावी
  • नाशिकमध्ये विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची माहिती घ्यावी तसेच त्यांच्या तपासण्या करून जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर करावा
  • शहरात मास्कची अवैध विक्री किंवा चुकीची माहिती पसरवून साठेबाजी करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासातर्फे कारवाई करण्यात यावी
  • खासगी डॉक्टरांची सेवा तसेच त्यांची जागा आणि उपकरणे अधिग्रहित करण्याची अनुमती देण्यात आली आहे
  • वेगवेगळ्या माध्यमांतून जनजागृती करणे
  • सरकारी रुग्णालये सहकार्य करत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करणे
  • आपल्याकडे असलेल्या अधिकारी आणि मनुष्यबळास प्रशिक्षित करणे

औषधसाठा नियंत्रित ठेवावा अशा अनेक गोष्टींचा या आपत्ती व्यवस्थापन कायद्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महापालिका स्तर, जिल्हा स्तर, अन्न आणि औषध प्रशासन स्तर, महसूल विभाग आदि विभागास आपापल्या जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या