मारहाण न करता तपास करा : महासंचालक सतीशचंद्र माथूर यांची पोलिसांना सूचना

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यात गुन्हे करणार्‍यांच्या संख्येत घट झाली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत दरोडा, जबरी चोरी यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अहवालात दिसत आहे. जिल्ह्यातील पोलिसांची संख्या कमी असून ती वाढविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

सांगलीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मारहाण न करता तपास करण्याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत. या घटना पुन्हा घडू नये, म्हणून काय उपाययोजना करायच्या या संदर्भात चर्चा करण्यासाठी 26 नोव्हेंबरला वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली असून त्यात सूचना देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी दिली.

राज्याचे पोलीस महासंचालक माथूर यांनी आज भेट देऊन आढावा घेतला. यावेळी झालेल्या बैठकीला नाशिक पोलीस महानिरिक्षक विनयकुमार चोबे, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक धनश्याम पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक  अक्षय शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थितीत होते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पोलीस महासंचालक माथूर म्हणाले की, सांगलीतील घटना वाईट आहे. पोलिसांनी अधिकाराचा वापर करुन वाईट काम केले आहे. त्याची शिक्षा त्यांना मिळेल, मात्र असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. कोणत्याही आरोपीला मारहाण न करता गुन्ह्याचा तपास व्हावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. असे प्रकार झाले तर त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याला जबाबदार धरले जाईल.

पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. गुन्हेगारी कमी झाली आहे, मात्र जबरी चोरी, दरोडे वाढले आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शिर्डीसह जिल्ह्यामध्ये मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे सुरवातीला होमगार्ड आणि नंतर गरजेनुसार पोलीस बळ वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे ते म्हणाले.

महिला, मुलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी खास युनिट तयार केले आहेत. असे गुन्हे करणार्‍या लोकांची ठरावीक वेळी तपासणी घेतली जायची. आता मात्र कधीही तपासणी करण्यात येणार आहे. अचानक नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. सायबरचा वापर वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर लोकांत सोशल मीडियासह अन्य वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे, असे माथूर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*