दीपोत्सव : दिव्यांचे प्रकार आणि त्यामागील शास्रशुद्ध माहिती

1
आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून शेवटापर्यंत आपल्या साथीला असतो दिवा… प्रकाशाची, प्रगतीची वाट दाखविणारा..अंतरी ज्ञानदीप प्रकाशित करणारा…दिव्यांचे प्रकार तरी किती..आकाशदीप, सभादीप, नंदादीप, यमदीप, स्थापित दीप.. ही नुसती नावंच नाहीत तर त्यामागे अर्थ देखील दडलेला आहे…

वा पाहुनी लक्ष्मी येते।
करू तिची प्रार्थना॥
शुभं करोती म्हणा,
मुलांनो शुभं करोती म्हणा॥
दिवा, दिवाळी, दीपोत्सव, दिप, दिपक या शब्दांमध्येच तेज आहे, प्रकाश आहे. म्हणजे प्रगतीची वाट आहे. असा हा दरवर्षी आनंदाचा येणारा दिवाळी सण. रोजही आपण म्हणतोच की, ‘दिव्या दिव्या दिपत्कार’ पासून तर ‘दिवा जळो देवापाशी, उजेड पडो तुळशीपाशी’ पण दिवाळी म्हटली की दिव्यांच्या दिव्यत्वाची आठवण येते.

दिवा हे ज्ञानाचे, तेजाचे, प्रगतीचे, प्रतीक आहे. दीपावली म्हटली म्हणजे सर्वप्रथम आकाशदिवा आणि खाली मांडलेली पणती डोळ्यासमोर येतात. या पणत्याच इतक्या सुंदर दिसतात ना की ती मातीची पणती, त्यातील तेवणारी तेलवात जीवनाचं जगण्याचं मोठं रहस्यच सांगून जाते. पणती, त्यातील कापसाची वात, त्यातील तेल हे स्वत: जळतं ते जगाला उजळण्यासाठी. त्यात त्यांचा स्वत:चा कोणताही स्वार्थ नसतो.

प्रकाशमान होण्यासाठी लागणारा अग्नीसुद्धा त्या प्रकाशण्यापुरताच घेतात. आपण आपलं आयुष्य जगाचं आणि समाजाचं, आपल्या कुटुंबाचं आयुष्य उजळण्यासाठी व्यतीत करावं, हा किती सुंदर संदेश पणतीमध्ये दडलेला आहे. या पणत्यासुद्धा किती वेगवेगळ्या असतात.

रंगबेरंगी, सुंदर नक्षीकाम केलेल्या, स्टॅण्ड असलेल्या पणत्यांचे झाड किंवा देवी, मोठ्या, कमळ, शंख, गोल, लांबट आकाराच्या लालचुटुक रंगाच्या सुंदर पणत्या, त्यांना उजळण्यासाठी तेलवात असली म्हणजे झालं. अगदी एखाद्या झोपडीतही ती तितकीच सुंदर दिसते आणि वृंदावनाजवळही.

एखाद्या आलिशान बंगल्यातही शोभते आणि चाळीतही. अपार्टमेंटमध्येही खुलते आणि मंदिरातही, अगदी कुठेही लावा, या पणतीचं सात्त्वीकपण जरासुद्धा कमी होत नाही. दिव्यांचे प्रकार तरी किती? अहो पणती, निरांजन, समई, लामण दिवा, पंचारती अगदी अगणित, त्यांचे आकार, त्यांचा धातू, त्यांचे सौंदर्य मन मोहून घेते.

दिवाळीची सुरुवात होते वसुबारसेपासून. मग काय वसुबारसेला संध्याकाळी गाय वासराला दिव्याने औंक्षण करून त्यांच्या टपोर्‍या डोळ्यातील भाव पाहण्याचा वेगळाच आनंद असतो. नरकचतुर्दशीला भल्या पहाटे काळोखात होणार्‍या आंघोळींना या पणत्याच साक्ष असतात. स्नानाच्या वेळी मध्येच हळद घातलेल्या दिव्याने ओवाळतांना एक विशेष मजा येते. आपण कुणीतरी खास आहोत, असं वाटायला लागतं. दिवा पाहुनी लक्ष्मी येते, म्हणून लक्ष्मी पूजनाला तर दिव्यांचा थाट काही अनोखाच असतो.

आकाशातील अगणिक तारका जमिनीवर लक्ष्मीच्या स्वागताला आल्याचा भास होतो. बाहेर आकाशदिवा दिमाखात तरंगतो तर खाली पणत्यांची रांग, पूजेसाठी दिव्यांची आरास आणि विजेच्या दिव्यांचा लखलखाट, अंधाराला लपायला कुठेसुद्धा जागा मिळत नाही. कुठेही बघा तेजाचे साम्राज्य असते. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, औक्षण करते, कुबेराकडे धन व चिरंजीविता मागते. भाऊबिजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते. या दिवाळी उत्सवानंतर त्रिपुरी पौर्णिमेला दीपमाळेवरील पणत्या आकाश उजळून टाकतात. अगदी आकाशाचा प्रकाशही त्यांच्यापुढे फिका वाटायला लागतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या समया, दिवे, निरांजने, लामण दिवे, देवाजवळ लावले की देवमूर्तीतलं देवत्व मनाला भिडतं. सर्व भाव अगदी देवचरणी लीन होतात आणि आनंदाश्रू वाहू लागतात, देवाशी जवळीक साधली जाते. नदीच्या पाण्यात दिवे सोडले की त्याचा प्रकाश पाण्यावर पडून ते पाणी वार्‍याने हलले की त्या प्रकाशित लाटा हेलकावे खात वाहू लागतात. जल, वायू आणि तेज यांचा अनोखा संगम पाहून आनंदाने मन मोहरून उठते. ते दृश्य सतत बघत राहवं असंच वाटत राहतं.
या सर्वात दिवाळीतल्या आकाश दिव्यांचे सौंदर्य काही वेगळेच असते.

जरा बाहेर फिरा, आकाशदिव्यांचे अनोखे आणि असंख्य प्रकार दिसून येतात. कुठे चांदणी, तर कुठे मोठा गोल चंद्र, तर कुठे दंडगोलाकृती विविध दिवे, कुठे सुंदर नक्षीकाम तर कुणावर सुंदर झिरमिळ्यांची आरास, कुठे लुकलुकते तारे तर कुठे सप्तरंगाचे हारतुरे, तर कुठे लांब शेपट्यांचे उंच आकाश दिवे खुणावतात. कुठे माझा दिमाख बघ म्हणून फिरता कंदील ऐटीत फिरून दाखवतो.

जणूकाही हे आकाशदिवे आपल्या पृथ्वीची ऐट, श्रीमंती.. आकाशाला दाखवित असतात. विजेचा शोध लागल्यापासून तर दिव्यांनाही दिवाळीत आगळेवेगळे स्थान प्राप्त झाले आहे. रंगीबेरंगी नाजूक-नाजूक असे हे दिवे घराच्या दारावर, बिल्डिंगवर, बंगल्यावर, झाडांवर हातात हात घालून ओळीने चमकत असतात व आपल्या रोषणाईचा आनंद मिळवून देत असतात. असे हे दिवे आपल्या जीवनातही अनेक प्रकारांनी येतात जसे-

1) आकाशदीप
उंचावर टांगलेला, दिमाखदार. हा स्वर्गातील पितरांना प्रकाश देतो, अशी समजूत आहे. तो भोवतालचा परिसर प्रकाशित करून टाकतो. आपलं कर्तृत्व, सात्विकता, सद्गुणांचा प्रकाश स्वर्गापर्यंत पोहोचेल इतका उजळून टाका, वाढवा असा संदेश त्यामध्ये आहे.

2) सभादीप
श्रावणामध्ये सौभाग्यासाठी सुवासिनी हा देवासमोर लावतात.

3) नंदादीप
अखंड तेवणारा असा, नवरात्रीचा महानायकच. त्याची ही किती रूपे कलशावर स्थापित केलेला मोठ्या पणतीच्या रूपातला नंदादीप, चारही बाजूंनी काचेचे जॅकेट घातलेला, कडांनी पितळ, तांबे, स्टेनलेस स्टीलची महिरप मिरविणारा असे किती प्रकार सांगावेत.

4) यमदीप
धनत्रयोदशीला सायंकाळी घराबाहेर दक्षिणेकडे (यमाच्या दिशेकडे) दिव्याचे तोंड करून त्यात काळ्या कापडाची वात लावतात. त्यामुळे अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा आहे.

5) स्थापित दीप
शुभप्रसंगी पूजेच्या वेळी समई लावून ठेवण्याची प्रथा आहे. दिवाळीत गच्चीवर, उंबरठ्यावर दिवा लावला की, दारिद्र्याचा अंधकार नाहीसा होतो.

6) औक्षदीप
औक्षणाच्या वेळी निरांजनीत दिवा लावतात व ओवाळताना, वाढदिवसाला, शुभप्रसंगी, लग्न, मुंज, धार्मिक विधीकार्य यावेळी त्याने औक्षण करतात. तो चांगल्या तुपाचा लावावा असा संकेत आहे. ते नसेल तर कोणतेही तूप अथवा तेल वापरले तरी सोयीचा भाग म्हणून चालू शकते. तसेच बैलपोळा, वसुबारसेला गायी वासरांना दिवा ओवाळून औक्षण करतात. त्यातही साजूक तुपाचा औक्षदिवा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो.

7) जलदीप
कार्तिक महिन्यात, अधिक महिन्यात तसेच तीर्थक्षेत्री द्रोणात फुलवात लावून हा दीप पाण्यात प्रवाहित करतात. रामकुंडापाशी असे दिवे मिळतात. ते अनेकजण गोदामाईला कसे अर्पण करतात हे आपण नेहमीच पाहतो. नदी ही आपली माता असते तिच्यामध्ये जलतत्व असते. त्याला आप म्हणजे तेज-प्रकाशतत्व अर्पण करण्याचा हा सोहळा म्हणजे दोन महाभूतांच्या संगमाचा सोहळा. त्याची सिद्धता या दिव्याने होते. तसेच तळ्यात कमळांच्या पानावरही या दिव्याने रोषणाई करतात.

8) कुलदीपक
घरात मुलगा झाला की त्याला कुलदीपक असे म्हटले जाते. परंतु आता मुलगा म्हणजेच कुलदीपक असे समजण्याचा काळ गेला. घरामध्ये मुलगा असो की मुलगी जे अपत्य जन्माला येईल ते कुलदीपकच.

असे दिव्यांचे अनंत प्रकार. दीप म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आहे. लग्नात सुद्धा डोक्यावर ‘झाली’मध्ये दिवा लावून दिव्याच्या साक्षीने मुलीची जबाबदारी वर पक्षाकडे सोपवतात. तसेच बारशाला पाळण्याखाली दिवे लावले जातात आणि मरणानंतरही त्या जागी दिवा ठेवला जातो. एकूण काय आपल्या आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून शेवटपर्यंत दिवा आपल्याला प्रकाशाची, प्रगतीची वाट दाखवित असतो. पण यासाठी अंतरीचा ज्ञानदिवा सतत तेवत ठेवला पाहिजे. अहंकाराच्या वार्‍याने तो विझणार नाही, याची काळजी घेऊ या व स्नेहदीप उजळत ठेवू या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*