Type to search

अशी आहे बलिप्रतिपदेची आख्यायिका

Diwali Articles Special

अशी आहे बलिप्रतिपदेची आख्यायिका

Share
बलिप्रतिपदा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा. दिवाळीचा पाडवा महापराक्रमी विक्रमादित्य राजाने सुरू केलेल्या विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिन. खरे तर शालिवाहन शकानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा होतो; पण व्यापारी जगतात दिवाळीच्या पाडव्यापासून नवे वर्ष सुरू होते.

बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तातील एक पूर्ण मुहूर्त. कोणत्याही कार्याची सुरुवात या दिवशी करणे अतिशय शुभ मानले जाते. सात चिरंजीव पुरुषात ज्याची गणना केली जाते त्या बळीराजाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो, म्हणून ही बलिप्रतिपदा.

बळी प्रल्हादचा नातू. अतिशय पराक्रमी, उदार आणि लोकप्रिय असा राक्षसांचा राजा. घोर तपश्चर्या करून त्याने मोठे सामर्थ्य मिळविलेले.

शेवटी स्वर्ग जिंकला. अर्थात देवांनी घाबरून जाऊन रूपे पालटली आणि परागंदा झाले. बळीने प्रल्हादाला स्वर्गात आणले व स्वर्गाचे राज्य त्याला दिले; पण प्रल्हादाने बळीलाच राज्यभिषेक केला आणि सांगितले ‘बाळा! धर्माने राज्य चालव.’ बळी स्वर्गाचा राजा झाला.

इंद्राची संपत्ती घेऊन तो दैत्योलोकी जात असताना ती संपत्ती समुद्रात पडली. तेव्हा देवांनी समुद्रमंथन करायचे ठरविले. भगवान विष्णू म्हणाले, ‘दैत्यांच्या मदतीशिवाय समुद्रमंथन होणार नाही’.

सर्व देव बळीकडे आले. बळीने त्यांना सहाय्य देण्याचे मान्य केले. समुद्रमंथन झाले. त्यातून अमृत मिळाले; पण ते देवांनीच घेतले. त्यामुळे दैत्य खवळले. त्यांनी इंद्राशी युद्ध सुरू केले. त्यात इंद्राने बळीला ठार केले; पण दैत्यगुरू शुक्राचार्यांनी त्याला जिवंत केले. राज्याभिषेक केला. बळीने विश्वजित यज्ञ केला. तेव्हा इंद्र परत भगवान विष्णूंकडे गेला. विष्णूंना विनंती केली ‘आपण कोणत्याही प्रकारे बळीराजाचे पारिपत्य करा.’

विष्णूंनी आदितीचा मुलगा म्हणून एका बटूच्या रूपाने वामनाच्या रूपात जन्म घेतला. हा बटू बळीराजाच्या यज्ञमंडपात आला. त्याने बळीच्या पराक्रमाची, कर्तृत्वाची, दातृत्वाची स्तुती केली. बलीनेही त्याची पूजा केली आणि विचारले ‘हे बटो! आपणास काय हवे ते मागा’ वामन म्हणाला, ‘बळीराजा मला तुझ्याकडून तीन पावले जमीन हवी आहे’. शुक्राचार्य तेथे होते. त्यांना या मागणीत काहीतरी कपट दिसले. ते बळीराजाला म्हणाले ‘अरे तू याची मागणी मान्य करू नकोस. हा बटू दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष विष्णू आहेत. तुझे शत्रू आहेत.

बळीने त्यांचे ऐकले नाही. उलट तो म्हणाला ‘आचार्य, प्रत्यक्ष विश्वनियंताच जर याचक होऊन माझ्या घरी आला आहे तर त्याने मागितलेली तीन पावले जमीन मी त्याला देणारच’.

बळी ऐकत नाही असे पाहून शुक्राचार्य संतापले. त्यांनी त्याला शाप दिला, तू स्वत:ला शहाणा समजतोस ना ठीक आहे. माझ्या आज्ञेचा तू अवमान करीत आहेस. लवकरच तू राज्यभ्रष्ट होशील आणि तरीही बळीने वामनाच्या हातावर तीन पावले जमिनीचे उदक सोडले.

वामन एकाएकी प्रचंड मोठा झाला. त्याने पहिले पाऊल उचलले आणि पृथ्वी व्यापली. दुसर्‍या पावलात स्वर्ग व्यापला. बळीला विचारले. बळीराजा, आता तिसरे पाऊल मी कुठे ठेऊ? बळीने तत्क्षणी स्वत:चे मस्तक त्याच्यापुढे केले, म्हणाला, ‘महाराज, तिसरे पाऊल या माझ्या मस्तकावर ठेवा.’ वामनाने तसे केले. ताबडतोब गरुडाने बळीला बांधले. ते पाहून प्रल्हादाने वामनावतारातील विष्णूंना विनंती केली, ‘बळीला आपण मुक्त करावे.’

विष्णूंनी त्याला मुक्त केले. ते म्हणाले, बळीराजा, तू आता सप्त पाताळांपैकी सुतळात जाऊन राहा. मी तेथे तुझा द्वारपाल म्हणून राहीन. माझे सुदर्शन चक्र तुझे रक्षण करील. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा आहे. ही प्रतिपदा, हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखली जाईल.

आजपासून या दिवशी लोक तुझी पूजा करतील. विष्णूंची आज्ञा मानून बळीराजा सुतळात गेला. तेथे म्हणजे केरळात त्याने राज्य स्थापन केले. केरळात लोक आजही बळीला राजा मानतात. त्यांच्या मनात बळीबद्दल मोठा आदरभाव आहे. महाराष्ट्रातही बळीविषयी प्रेम आहे. दिवाळीत बलिप्रतिपदेला त्याची पूजा करून महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लोक इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, अशी प्रार्थना करतात. याचे कारण बळीचे राज्य हे सुराज्य होते हेच आहे.

बळीविषयीच्या या प्रेमाच्या, आदराच्या भावनेतूनच बळीराजाची पूजा केली जाते. त्यासाठी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढली जातात. त्यांची पूजा होते, नैवेद्य दाखविला जातो आणि प्रार्थना केली जाते…

बळीराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो ।
भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम्॥
अर्थ असा – हे विरोचनपुत्र, सामर्थ्यशाली बळीराजा तुला नमस्कार. तू भविष्यातील इंद्र आहेस, असुरांचा शत्रू आहेस. मी तुझी पूजा केलेली आहे. या पूजेचा तू स्वीकार करावास.
पूजेनंतर दीपदान आणि वस्त्रदानही केले जाते.

बळीराजाच्या पूजेच्याही विविध पद्धती दिसतात. काही ठिकाणी अंगणात घराच्या दारासमोर रांगोळीच्या चौकात बळीराजाची शेणाची आकृती काढून तिच्यावर पणती लावून पूजा करतात. आंध्र प्रदेशात बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवून पूजा करतात. गायी-बैलांना रंगवून, माळांनी सजवून मिरवणूक काढतात. केरळात ‘ओणम’ साजरा होतो. बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे लावूनही हा दिवस साजरा होतो. बळीराजा दैत्यराज असला तरी तो दुष्ट नव्हता. प्रजाहितदक्ष होता. उदार दाता होता. त्याचे राज्य हे प्रजेच्या दृष्टीने सुराज्य होते. म्हणून बलिप्रतिपदेचा दिवस असा साजरा होतो.

मथुरा-वृंदावन भागात या दिवशी गोवर्धन पर्वताची शेणाची प्रतिमा करून पूजा होते. गोवर्धन पर्वत धारणानंतर सात दिवसांनी कार्तिक शुद्ध प्रतिपदा आलेली. म्हणून ही पूजा. राजस्थानात श्रीराम वनवासातून याच दिवशी आले म्हणून लंकादहनाचा देखावा केला जातो. फटाक्यांची आतषबाजी होते. अन्नकोट करून अन्नवाटप केले जाते. पंजाबमध्ये अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दिव्यांची सुरेख रोषणाई करून हा दिवस आणि पुढील नववर्ष प्रकाशमय करण्याचा संकल्पच जणू सोडला जातो.

घराघरांतून अमावस्येच्या दिवशी मोठ्या उत्साहात, आनंदात लक्ष्मीपूजन झालेले असते. ही लक्ष्मी अशीच स्थिर राहावी, वाढावी म्हणून पाडव्याच्या दिवशी घराघरांतून दिव्यांची आरास असते. रंगीबेरंगी आकाशकंदील स्वागत करीत असतात. घर अंगण सुरेख रांगोळ्यांनी सजलेले असते.

मिष्टान्न भोजन करून तृप्त मनाने, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून हा दीपोत्सव, प्रकाशाचा उत्सव संपन्न होत असतो. नवीन वर्षाच्या या आरंभादिनी आपणही नवे संकल्प करूया. आपले भविष्य उज्ज्वल करूया. प्रकाशमय करूया. नववर्षाचे स्वागत करूया. सर्वांना दीपावलीसाठी आणि नवीन वर्षासाठी शुभेच्छा देऊयात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!