मोहाडी जानोरीच्या फुल शेतकऱ्यांना परकीय गुंतवणूकीचे वेध

मेक इन नाशिकच्या माध्यमातून फुलनिर्यातीसाठी सज्ज

0

मुंबई (विशेष प्रतिनिधी) दि. ३१ : द्राक्ष आणि डाळिंब निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसंदर्भात आता ‘कॉर्पोरेट वाट’ चोखाळली आहे.

मोठ्या उद्योगांप्रमाणेच या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत गुंतवणूक करण्यासाठी थेट परकीय गुंतवणूकदारांना आमंत्रण देण्याचा फंडा शोधून काढला आहे. त्यासाठी मुंबईत नेहरू सेंटर येथे सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी मेक इन नाशिक कार्यक्रमातील उद्योगांच्या प्रदर्शनात या शेतकऱ्यांनीही स्टॉल लावला आहे.

अलिकडच्या काही वर्षांपासून दिंडोरी तालुक्यातील जानोरी, मोहाडी परिसरात पॉलिहाऊसमधील फुलशेतीने विकासाचा बहर धरला आहे. पाणी वाटप संस्थांच्या माध्यमातून वाघाड धरणातील पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि तरुण तडफदार शेतकऱ्यांजवळ असलेली शेतीची आधुनिक दृष्टी यांचा मेळ त्यासाठी कारणीभूत आहे.

त्यामुळेच या परिसरात निर्यातक्षम द्राक्षांसोबतच निर्यातक्षम दर्जाची गुलाब, जरबेरा अशी विविध फुले पॉलिहाऊसमध्ये उत्पादीत होत आहेत. सध्या नाशिकसोबतच मुंबईसह देशातील काही भागात या फुलांना मार्केट मिळत आहे. मात्र येथील तरुण शेतकऱ्यांची महत्त्वकांक्षा ही फुले परदेशात निर्यात करण्याची आहे.

जगात प्रसिद्ध असलेल्या हॉलंडच्या फुलबाजारासह युरोप- अमेरिकेत त्यांना मोहाडी जानोरीची फुले विक्रीला न्यायची आहेत. इतकेच नव्हे, तर आपली शेती आधुनिक व्यापारी पद्धतीने विकसित कुणी परकिय गुंतवणुकदार तयार त्यांच्या गुंतवणुकीलाही या शेतकऱ्यांनी तयारी दाखवत कॉपोर्रेट क्षेत्राच्या तुलनेत शेतकरी कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे.

नाशिक फ्लोरिकल्चर पार्क या नावाने या परिसरातील सर्व फुलउत्पादक एकत्र आले आहे. त्यासाठी त्यांना ग्रामसमृद्‌धी फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले आहेत. प्रकाश महाले, राहुल व सोमनाथ मौले, संजय गोवर्धने, रविंद्र विधाते, हर्षल काठे, गणेश वाघ, योगेश पाटील अशी काही त्या शेतकऱ्यांची नावे आहेत. सुनिल मौले म्हणाले की आम्हाला आता हॉलंडच्या बाजारपेठेचे वेध लागले आहे. कॉर्पोरेट शेतीच्या दृष्टीने आम्ही आता परकीय गुंतवणूकदारही शोधत आहोत. ‘मेक इन नाशिक’मध्ये पहिल्याच दिवशी त्यांच्या स्टॉलला काही परकीय उद्योजकांनी भेटी दिल्या. कुवेतच्या एका उद्योजकाने तर आगामी काळात फुलांची मोठी ऑर्डर देण्याचे आश्वासनही त्यांना दिले आहे. त्यामुळे सध्या या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी द्राक्षातील आधुनिक प्रयोग आणि शेतीमधील धडपडीसाठी आता जगभर प्रसिद्ध झाले आहेत. अलिकडच्या काही वर्षात फुलशेतीतही त्यांनी जम बसवायला सुरुवात केली आहे. जानोरीच्या परसातच  आता ओझरर विमानतळ आणि कर्गो हब बनले आहे.

भविष्यात तेथून पुण्याप्रमाणेच फुलांच्या निर्यातीला सुरुवात होईल याबाबत हे शेतकरी आशावादी आहेत. विमानतळापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणाऱ्या मोहाडी गावात फुलांचे पॅकेजिंग युनिट सुरू झाले आहे. त्याचाही फायदा भविष्यातील फुलनिर्यातीला होणार आहे.

मंगळवारी मेक इन नाशिकच्या बीजभाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी प्रक्रियेला नाशिकमध्ये वाव असून त्यावर भर देण्याचा सल्ला दिला. मात्र नाशिकच्या या धडपड्या शेतकऱ्यांनी त्यापूर्वीच कॉर्पोरेट शेतीच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. ही बाब मेक इन नाशिक आणि नाशिकच्या कृषी क्षेत्रासाठी नक्कीच आश्वासक आहे.

 

LEAVE A REPLY

*