वुई द ट्रेंडसेटर्स : मंत्रभूमीत जपली संस्कृती

0

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानणारी संस्कृती! जेवणालाही यज्ञकर्म मानणारी आपली संस्कृती…! मनामनांत रुजलेली एक सहज प्रवृत्ती, युगानुयुगे अव्याहत झिरपत आपल्यापर्यंत पोहोचलेली निर्मळ झर्‍यासारखी, शहरातल्या या टोलेजंग इमारतीत अंगण आणि आकाशाच्या तुकड्यासाठी आसूसलेली आपली संस्कृती…!

दिग्विजय मानकर, संचालक

नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या पवित्र मार्गावर 24 मार्च 2002 रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते संस्कृतीचे उद्घाटन झाले. संस्कृतीमध्ये संपूर्णत: महाराष्ट्रीयन परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत उगम पावणार्‍या गंगा गौतमी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या गावात एक मोठी विहीर आहे.

त्यावर पूर्वीचा रहाट जो आपले पूर्वज वापरत होते तसा रहाट आहे. तसेच विद्युतपंप येण्याअगोदर या ठिकाणी आहे चमड्यापासून बनवलेली मोट, थोरोळे, चाक, कणा, सौंदर, दोरखंड. आपल्याला येथे ‘माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं गुलाब, जाई जुई, मोगरा फुलवीत’ हे गाण्याचे स्वरही कानांवर पडतील.

संस्कृतीमध्ये तीन एकरचे प्रशस्त प्रांगण, निर्मळ पाणी, यथेच्छ भोजन, आत एक सुखद स्वप्ननगरी… सर्व प्रकल्पामध्ये 5 हजारपेक्षा जास्त लहान-मोठी झाडे लावलेली आहेत. त्यामुळे हा प्रकल्प संपूर्णत: निसर्गरम्य वनराईने नटलेला आहे. संस्कृतीमध्ये ‘आपलं गांव’ या ग्रामीण खेड्याची प्रतिकृती उभारलेली असून या ठिकाणी जुन्या काळातील दगडी गावाची वेस, दिंडी, दरवाजा, गणपती मंदिर, सुतार, लोहार, कुंभार असे बारा बलुतेदारांचे प्रतिनिधित्व करणार्‍या प्रतिकृती व वासुदेव, ज्योतिष तसेच गाय, घोडा, बदक इ. प्राणी ठेवण्यात आले आहेत.

आपल्या गावामध्ये जुन्या काळातील दोन मजली लाकडी बांधकामाचा ‘पाटीलवाडा’ तयार केलेला असून दारासमोर सडा, रांगोळी, समोर पाटलाचा चौसोपी वाडा, या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना खास ‘मातीच्या चुलीवर’ शिजवलेले महाराष्ट्रीयन पद्धतीचे ठेचा, झुणका, बाजरीची भाकरी व स्वादिष्ट जिलेबी अशा प्रकारचे जेवण पाट-चौरंगावर बसून दिले जाते. संकृतीमध्ये लाकडी वस्तूमधून सामाजिक संदेश देणारे 200 पेक्षा अधिक वस्तूंचे ‘ग्राम शिल्प संग्राहालय’ उभारण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे आहेत. त्यामुळे शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात संस्कृतीला भेट देतात. संस्कृतीमध्ये फास्टफूड, रानवारा, आपलं गांव, आंध्रा थाळी, महाराष्ट्रीयन थाळी, गुजराती थाळी असे स्वतंत्र रेस्टाँरंटस् आहेत. संस्कृतीमध्ये एक एकरची प्रशस्त ‘संस्कृती संगम’ लॉन असून या ठिकाणी लग्न, स्वागत समारंभ, वाढदिवस, कंपन्यांच्या पार्टीज मोठ्या प्रमाणात होतात. संस्कृतीमध्ये मुलांसाठी स्वतंत्र चिल्ड्रन पार्क असून या ठिकाणी रेल्वे, घोडागाडी, बैलगाडी, पाण्याचे कारंजे, धबधबे, गाय, बैल, घोडा, कुत्रे, बदक पाहायला मिळतात.

संस्कृतीने सुरुवातीपासून भातुकलीचे प्रदर्शन, शस्त्रास्त्रे, चित्रपट महोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, गावरान जत्रा असे आगळेवेगळे उपक्रम सातत्याने राबवले. संस्कृतीला सन 2004 साली आयएसओ 9001:2000 हे गुणवत्ता प्रणालीचे नामांकन मिळाले आहे. संस्कृतीमध्ये वर्षभर महाराष्ट्रीयन सण, उत्सव साजरे केले जातात. उदा. 1 जानेवारी नवीन वर्षाचे स्वागत, 26 जानेवारी गावरान जत्रा, 24 मार्च संस्कृती वर्धापनदिन, श्रावणात चहा महोत्सव, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटनदिन, दिवाळीत कोजागिरी व भातुकली प्रदर्शन, नोव्हेंबरमध्ये ऐतिहासिक शस्त्रास्त्रे प्रदर्शन इ. हॉटेल संस्कृती आणि मामाचा मळा ही दोन्ही पर्यटन केंद्रे नाशिकरांमध्ये तसेच बाहेरून नाशिकमध्ये येणार्‍यांसाठी आकर्षण स्थळे ठरली आहेत. केवळ हॉटेल चालवणे हे आमचे ध्येय नव्हते.

माझी आई कविता मानकर यांनी नाशिकची संस्कृती, पर्यटन, आपली परंपरा यांची सुयोग्य सांगड घालून ‘हॉटेल संस्कृती’ हे विविधरंगी संस्कृतीचे प्रतिबिंब निर्माण केले. लहानपणापासून आजीने ‘अतिथी देवो भव’ अशी शिकवण दिली. यामुळेच वयाच्या 17 व्या वर्षी मी घरच्या व्यवसायात लक्ष घालू लागलो. घरातील व्यावसायिक वातावरणाने मला ग्राहकांची मानसिकता लवकर कळायला लागली. यापुढे मोठी झेप घेण्याची स्वप्ने बघताना माझे पाय भक्कम पायावर रोवले आहेत याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

मखमलाबाद हे नाशिक शहराला लागून असलेले 9 किलोमीटरील ग्रामीण परंपरा जपणारे गाव. येथील निसर्गरम्य आणि आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते जपणार्‍या मातीत मी जन्माला आलो. शालेय शिक्षण मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात झाले. अभ्यासाबरोबरच मैदानी खेळांची आवड रुजली. महाविद्यालयीन शिक्षण संपताच घरच्या ‘संस्कृती’त माझी पावले वळली.

आजी भागूबाई मानकर हिने कष्टातून श्रमाचे संस्कार केले. आई कविता मानकर हिने प्रोत्साहन दिले. कृषी पर्यटन विकास संस्था, पुणे यांच्याकडून दरवर्षी कृषी पर्यटन क्षेत्रात काम करणार्‍या प्रकल्पाला गौरवण्यात येते. त्यांच्यामार्फत संस्कृती ग्रो टूरिझमच्या ‘मामाचा मळा’ या केंद्रास राज्यस्तरीय कृषी पर्यटन गौरव पुरस्कार 2016 देण्यात आला. हॉटेल संस्कृतीच्या वतीने महाराष्ट्रीयन परंपरांचे जतन आणि संवर्धन केले जाते, तर मामाचा मळा या कृषी केंद्राद्वारे भारतीय कृषी संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी हा आमचा उद्देश आहे. त्याची दखल घेतली जात आहे हे या पुरस्कारांनी सिद्ध केले आहे.

भारतीय ग्रामीण व शहरी लोकांमध्ये आदरातिथ्याचा भाग म्हणून चहापानाला विशेष महत्त्व आहे. चहा हे आदरातिथ्याचे प्रतीक मानले जाते. हे पेय आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. त्यामुळे हॉटेल संस्कृती व मामाचा मळामध्ये 1 ऑगस्ट 2018 पासून चहा-भजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हे या महोत्सवाचे 10 वे वर्ष आहे. यात चहामध्ये गवती चहा, आयुर्वेदिक काढा चहा, निलगिरी चहा, जिंजर चहा, सुंठ काळी मिरी चहा, साधा चहा, मसाला चहा, मलई चहा, संस्कृती स्पेशल चहा, ब्लॅक चहा, गुलाब चहा, चॉकलेट चहा, स्पेशल रेडिमेड चहा, लेमन चहा, ऑरेंज चहा, मिंट चहा, इराणी चहा, इंग्लिश चहा अशा विविध चहांच्या प्रकाराचा आस्वाद घेता येतो.

नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या पवित्र मार्गावर 17 वर्षांपासून सातत्याने ‘हॉटेल संस्कृती’ भारतीय परंपरेचे दर्शन आणि आपुलकीचे भोजन देण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्कृती नेहमीच नवनवीन भारतीय खानपान व पदार्थांची चव रसिकांना देण्याचा प्रयत्न करीत असते. यासाठी हॉटेल संस्कृतीत दरवर्षी ‘पुरणपोळी व आमरस महोत्सव’ होतो. महाराष्ट्रीयन संस्कृतीचे व परंपरेचे जतन करण्याबरोबरच आपुलकीचे भोजन देण्याच्या उद्देशाने 17 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संस्कृती या पर्यटन केंद्राला देशातील व परदेशातील रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.

LEAVE A REPLY

*