Thursday, May 2, 2024
Homeनगरडिग्रसमधून बेकायदा वाळू तस्करीमुळे बंधारा धोक्यात

डिग्रसमधून बेकायदा वाळू तस्करीमुळे बंधारा धोक्यात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे दिवसरात्र खुलेआम बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्कर असलेल्या त्रिदेवांनी डिग्रसच्या बंधार्‍याजवळच वाळूसाठी उत्खनन सुरू केल्याने

- Advertisement -

बंधार्‍याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासून ही वाळू तस्करी सुरू असून या वाळू तस्करीला मोठ्या पुढार्‍यांचा आशिर्वाद असल्याने तहसीलदारच काय पण जिल्हाधिकारीही वाळू तस्करी रोखू शकत नसल्याने बेकायदा वाळू उपशाला उधाण आले आहे. ही वाळू तस्करी तातडीने बंद करण्याची मागणी होत असून वाळूची वाहतूक मुळा धरण परिसरातील रस्त्यांवरून सुरू असल्याने मुळा धरणाचीही सुरक्षा धोक्यात आली आहे.

रात्रंदिवस ही वाळू तस्करी सुरू आहे. तालुक्यात एकीकडे शासकीय वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी संगनमत करून पाठ फिरविली असताना महसूलच्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीवर पाणी फिरले असतानाच डिग्रस येथील वाळू तस्करीला पायबंद घालण्यास तालुक्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेनेही हात टेकले आहेत. त्यामुळे नागरिकांसह शेतकरीही संतप्त झाले आहेत.

या अवैध वाळू वाहतुकीने गावातील रस्त्यांचे तीन तेरा वाजले आहेत. या अवैध वाळू वाहतुकीला आळा घातला नाही तर नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होणार असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. डिग्रस गावामध्ये दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे गावातील व परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गावातील शेतकर्‍यांच्या उसाची तोड करण्यासाठी ऊस तोडणी कामगार येण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

डिग्रस हद्दीतील नदीपात्रातून ही वाळू वाहतूक सर्रास सुरू झाली असून केटीवेअरच्या पायथ्याजवळील वाळू काढण्याचा प्रकार दैनंदिन सुरू असल्याने केटीवेअरला धोका निर्माण झाला आहे. सततच्या वाळू तस्करीमुळे हा केटीवेअरचा पूल अखेरच्या घटका मोजत आहे. चोवीस तासात सुमारे 50 हून अधिक ढंपर भरून वाळू वाहतुकीची वाहने बेफाम वेगाने गावातून धावत असल्याने नागरिकांची सुरक्षा रामभरोसे बनली आहे.

याबाबत राहुरीचे तहसीलदार शेख यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली नाही व वाळू वाहतूक करणार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकार्‍यांनीच या वाळू तस्करीकडे लक्ष देऊन संबंधित त्रिदेव ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या