डिग्रसला चिनी मालाची महिलांनीच केली होळी

0
राहुरी विद्यापीठ (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानांतर्गत राजमाता जिजाऊ महिला मंडळाने चिनी मालाची होळी केली. चिनी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा स्वीकार, अशी घोषणा करून महिलांनी जनजागृतीपर स्वदेशी माल खरेदी करण्याचे आवाहन केले.
डिग्रस येथील सहकारी संस्थेच्या प्रांगणात महिलांनी चिनी मालाची होळी पेटवून ग्रामस्थांचे प्रबोधन केले. चिनी मालामुळे होणारे दुष्परिणाम, त्यामुळे आपल्या देशातील व्यापारात होणारे नुकसान यावर जनजागृती केली. यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाचे गणेश भांड यांनी चिनी वस्तुंच्या लोंढ्यामुळे आपल्या देशातील उद्योग धंदे बंद पडत असल्याची खंत व्यक्त केली.
उद्योग धंदे बंद पडत असून रोजगार संपुष्टात येत असल्याची भीती व्यक्त करून देशभक्तीची मशाल धगधगती ठेवण्यासाठी स्वदेशी मालाची खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिजाऊ महिला मंडळाच्या वैशाली टेके यांनी निकृष्ट दर्जाच्या चिनी वस्तुमुळे आरोग्याचे व पर्यावरणाचे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ऋषिकेश भिंगारदे, सुरज शिंदे, महेश शेळके, राहुल भिंगारकर, सीमा शिंदे, मंगल बेल्हेकर, शिला आव्हाड, कल्पना भिंगारदे, कडूबाई घुले, राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सदस्या, बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*