डिजिटल शिक्षण गेले ‘अंधारात’

श्रीरामपूर तालुक्यात झेडपीच्या 20 शाळा अडकल्या महावितरणच्या वसुली मोहिमेत

श्रीरामपूर – सध्या डिजिटल इंडियाचे वारे वाहत असून शासनानेही जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली आहे. मात्र वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील सुमारे 20 शाळांचे वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत सध्या डिजिटल शिक्षण ‘अंधारात’ असाच काहीसी प्रकार पाहावयास मिळत असून महावितरण कंपनीच्या वीज बिल वसुली मोहिमेत तालुक्यातील शाळा अडकल्याचे चित्र आहे.

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षण मिळावे, या हेतूने तालुक्यातील सर्व शाळा डिजिटल करण्यात आलेल्या आहेत. या माध्यमातून संगणकाद्वारे विद्यार्थ्यांकडून धडे गिरविले जात आहेत. मात्र या शिक्षणावर आता विजेचे संकट आल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यही अंधारात दिसत आहे. एकीकडे शासन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आग्रही असताना दुसरीकडे मात्र वीज बिलाच्या नावाखाली वीज कनेक्शन कट करुन शाळांना वेठीस धरण्याचे काम करत असल्याचे प्रत्ययास येते. जिल्ह परिषद शाळा ग्रामपंचायतीकडून 14 व्या वित्त आयोगातून मिळणार्‍या निधीतून वीज, आरोग्य यासारखे खर्च भागवित असते. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी शाळांना निधीच दिला नसल्याने त्यांना वीज बिला सह इतर खर्च करण्यास अडचणी येत आहेत. पर्यायाने याचा परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर होणार हे मात्र नक्की.

तालुक्यातील 47 शाळांकडे महावितरण कंपनीची वीज जोडणी असून या शाळांचे एक लाख 23 हजार 728 रुपये वीज बिल थकीत आहे. मात्र यापैकी 20 शाळा आपल्याकडील 74 हजार 297 रुपये वीजबिलाची थकबाकी भरु न शकल्याने महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारत या शाळांचे वीज कनेक्शन कट केले आहे. त्यामुळे विजेअभावी या 20 शाळांत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर डिजिटल शिक्षणही अंधारात गेले आहे. विजबिल भरण्यासाठी निधी मिळावा, म्हणून बहुतांशी शाळांच्या मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायतींना पत्र दिले आहे. मात्र अजूनही निधी उपलब्ध न झाल्याने शाळेची वीज कट होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कारवाडी (कारेगाव), जिल्हा परिषद शाळा सूतगिरणी संजयनगर (श्रीरामपूर), जिल्हा परिषद शाळा (मातुलठाण), जिल्हा परिषद शाळा पटारे वस्ती (निमगाव खैरी), जिल्हा परिषद उर्दू शाळा (हरेगाव), जीवन शिक्षण मंदिर (टाकळीभान), जिल्हा परिषद शाळा (भोकर), जिल्हा परिषद शाळा (पुनतगाव), जीवन शिक्षण मंदिर (कारेगाव), जिल्हा परिषद शाळा (जवाहरवाडी-हनुमानवाडी), जिल्हा परिषद शाळा (माळेवाडी), जिल्हा परिषद शाळा (रामकृष्णनगर, शिरसगाव), जिल्हा परिषद शाळा (शिरसगाव), जिल्हा परिषद शिरसगाव, जिल्हा परिषद शाळा (एकलहरे), जिल्हा परिषद शाळा (एकलहरे), जिल्हा परिषद शाळा (बेलापूर बन, बेलापूर खुर्द), जिल्हा परिषद शाळा पुजारी वस्ती, जिल्हा परिषद शाळा (कान्हेगाव), जिल्हा परिषद शाळा (बेलापूर बुद्रूक) या शाळांचे वीज कनेक्शन थकबाकीमुळे कट करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वीही शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद शाळांसाठी वीज मोफत करावी, अशी मागणी शासनाकडे केलेली आहे. मात्र राज्य शासनाने या मागणीकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांशी स्पर्धा करत असताना जिल्हा परिषदेच्या शाळांना अशा संकटांना सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाईन नोटिसा पाठविल्या
महाराष्ट्र इलेक्ट्रीसिटी रेग्युलिटी कमिशनच्या आदेशानुसार संबंधित शाळांना थकीत वीज बिलाबाबत ऑनलाईन नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत.
– श्री. कांबळे, महावितरण, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग श्रीरामपूर.

पूर्वसूचना न देता वीज कट
याबाबत एका शाळेच्या मुख्याध्यापिकेस विचारणा केली असता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना किंवा कोणतीही लेखी न देता वीज कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे मुलांना डिजिटल क्लास बोर्डवर शिकवणे अवघड झाले आहे. तसेच इतर संगणकीय कामे करता येत नाहीत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वीज जोडणी बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आली. त्यामुळे अशा शाळांची वीज जोडणी ग्रामपंचायत 14 व्या वित्त आयोगातून करण्याबाबत 8 जुलै 2019 च्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आलेला आहे. तसेच मुख्याध्यापकांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर ग्रामपंचायतींनी वीज बिल भरून याबाबतचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आलेले आहेत.
– सुनील सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी, श्रीरामपूर पं. स.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *