Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

काथरगावकर म्हणतात, दुष्काळच बरा!; अतिपाण्यामुळे जमिनी नापीक

Share

निफाड । आनंद जाधव

अवघा निफाड तालुका दुष्काळात आणि पाणीटंचाईत होरपळत असताना काथरगावकरांना मात्र हाच दुष्काळ वरदान ठरला आहे. नेहमीच पाण्याखाली राहणार्‍या या भागातील शेतजमिनी क्षारयुक्त होऊन नापीक झाल्या आहेत. मात्र नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडेठाक होते तेव्हा येथील जमिनी कोरड्या होऊन त्यांचा पोत सुधारतो आणि पीकदेखील जोमदार येते. म्हणूनच ‘आम्हाला दुष्काळ वरदान ठरत आहे’ असे काथरगावचे शेतकरी म्हणत आहेत.

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्याचा फुगवटा काथरगावपर्यंत येत असल्याने गावाच्या तिन्ही बाजूने पाणीच पाणी असते. जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील जमिनी नापीक झाल्या आहेत. अगदी घरांतही ओलसरपणा जाणवतो. पावसाळा व हिवाळा हे दोन्ही ऋतू येथील लोकांंसाठी डोकेदुखी ठरतात.

या ऋतूत शेती पाण्याखाली असते. त्यामुळे उसासारखे पीकदेखील पिवळे पडून जळते. उन्हाळ्यात धरण कोरडेठाक पडते. तेव्हा मात्र येथील जमिनीतील आर्द्रता कमी होते. जमीन नांगरून उन्हाने शेकल्यास जमिनीत जोमदार पीक येते. गावाच्या कोणत्याही भागात खड्डा खोदल्यास पाणी हमखास लागते. म्हणूनच या परिसराला ‘दुबई’ असे संबोधले जाते.

सद्यस्थितीत निफाड तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. चारा, पाण्यासाठी जनावरांना बाजाराची वाट दाखवावी लागत आहे.

मात्र याउलट काथरगावची परिस्थिती आहे. येथील प्रत्येक विहिरीला भरपूर पाणी आणि उन्हाळ्यात जमीन कोरडी झाल्याने पिकांसाठी शेत अनुकूल होते. अशा जमिनीत पीक जोमदार येते.

परिणामी दरवर्षी पडणारा दुष्काळ म्हणजे काथरगावकरांसाठी आनंद पर्वणीच ठरते. एरवी मात्र सर्वत्र दलदल आणि पाण्याचे साचलेले डबके! पाण्याबरोबरच या शिवारात बिबट्याचाही नित्याचा वावर! त्यामुळे दहशतीचे वातावरण नित्याचेच! सध्या जमीन कोरडी पडल्याने शेतकरी शेतीच्या मशागतीत व्यस्त आहेत. मात्र परिसरातील वाढते वीज भारनियमन आता मोठी डोकेदुखी ठरु पाहत आहे. काथरगावचा संपूर्ण शिवार पाण्याने व्यापलेला असल्याने येथे डासांचा मोठा प्रादुर्भाव आहे. थंडी, ताप, मलेरिया आदी साथीचे आजार येथे ठरलेले असले तरी उन्हाळा मात्र परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा देणारा ठरत आहे.

म्हणतात ना ‘पाणी रे पाणी तेरा रंग कैसा…?’ एकूणच पाणी वेगवेगळ्या भागात आपले रंग-ढंग दाखवत आहे. कुठे जास्त पाणी तर कुठे पाण्यासाठी आणीबाणी! काथरगावकरांची गाठ मात्र पाण्याशी पडलेली.

‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी या गावाची गत झालेली. त्यामुळे हेच पाणी गावाला आता नकोसे वाटत असले तरी नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी तर येणारच आणि काथरगावकरांचे रडगाणे देखील चालू राहणार यात शंकाच नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!