…तर वेगळा निर्णय-खडसे

…तर वेगळा निर्णय-खडसे

जळगाव  – 

गेली चार वर्षे माझ्याच पक्षात  माझ्याविरुद्ध कारवाया करणार्‍यांची पुराव्यानिशी तक्रार मी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही, तर मात्र मी येत्या चार ते पाच दिवसांत पक्षांतराचा वेगळा निर्णय घेईन, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर आपली भावना शुक्रवारी सायंकाळी जळगावात बोलून दाखविली.

शुक्रवारी खडसे हे शहरातील आपल्या मुक्ताई बंगल्यावर आले होते. त्यावेळी ते निवडक माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी खडसे म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांत आपण नागपुरात शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत राजकीय चर्चादेखील झाली. मी भाजपा सोडून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षात यावे, यासाठी तिन्ही पक्षाचे नेते अनुकूल आहेत. मात्र, अजूनपर्यंत माझा निर्णय झालेला नाही.

गेल्या चार वर्षात खूप काही सहन केले. आताही सहन करतोय, मी नाराज जरूर आहे. मात्र, पक्षावर नाराज नाही, तर जी चार-पाच लोकं पक्ष चालवताय त्यांच्यावर नाराज आहे, असा खुलासाही त्यांनी या वेळी केला.

माझा काही दोष असेल, मी कुठे चुकलो असेल तर व्यक्तिगत मला बोलावून सांगा, मी पण ते ऐकायला तयार आहे. मात्र, काही दोष नसताना विनाकारण छळ होत असेल तर मात्र वेगळा विचार करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com