मेंढपाळावर कुर्‍हाडीने हल्ला; सात जणांविरुद्ध गुन्हा

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-लहान मुलांच्या भांडणाच्या वादातून मेंढपाळावर कुर्‍हाडीने हल्ला केल्याची घटना नवागाव येथे घडली. या प्रकरणी सात जणांविरुध्द निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नवागाव, ता. साक्री येथे राहणारे लहानू काळू गोयकर यांच्यावर लहान मुलांच्या भांडण्याच्या वादातून अर्जून भिका गोयकरसह सात जणांनी हल्ला केला.

यावेळी या सात जणांनी लहानू यांना काठ्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत निजामपूर पोलिस ठाण्यात लहानू काळू गोयकर यांनी फिर्याद दिली.

भादंवि 326, 143, 147, 149, 323, 504, 506 प्रमाणे अर्जुन भिका गोयकर, चैत्राम भिका गोयकर, साहेबराव भिका गोयकर, पांडू भिका गोयकर, पिंटू डिगा गोयकर, साखरबाई अर्जुन गोयकर, संतोष डिगा गोयकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

60 हजार लुबाडले –विखरण, ता. शिरपूर येथे राहणारे देविदास शिवाजी पाटील व त्यांची पत्नी यांचे एसबीआय बँकेत जॉईंट खाते आहे.

त्यांचा एटीएम कार्डाची माहिती अज्ञात व्यक्तीने घेवून त्यांच्या खात्यातून 59 हजार 990 रुपये काढून फसवणूक केली. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात देवीदास शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली.

भादंवि 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे अज्ञात व्यक्तविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातात ठार –मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ हॉटेल शिवरायनजीक अज्ञात वाहनाने पादचारी मोहन नाना पावरा (वय50) रा. खरगोन याला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पुनमचंद नाना वासखले यांनी फिर्याद दिली. भादंवि 304 अ, 279, मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*