नकाणे रोडवरील दारु दुकानाविरुद्ध महिलांचा ‘एल्गार’

0
धुळे । दि.17 । प्रतिनिधी-शहरातील नकाणे रोडवरील प्रमोदनगर सेक्टर दोनमधील बिअरबार व त्याच्याजवळ नव्याने सुरु होणारे वाईनशॉप दुकान हटविण्यासाठी महिलांनी एल्गार पुकारला आहे.
सदर दुकान हटविण्यासाठी महिलांना भजन आंदोलन सुरु केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 500 कि.मी.अंतरावरील दारुचे दुकाने, बिअरबार हे बंद करण्याचे दि. 1 एप्रिल रोजी निर्देश दिले.
त्यानुसार शहरातील 34 दुकाने बंद झालीत व तीन दुकाने या अंतर्गत येत नसल्यामुळे सुरु आहेत. त्यात नकाणे रोडवरील हॉटेल न्यू कुणाल बिअरबारचा समावेश आहे.
सदर दुकान भरवस्तीत असल्याने हटविण्यात यावे तसेच या परिसरात नव्याने दोन दारु दुकाने व बिअरबार सुरु करण्यात येणार आहे.

त्याला या परिसरातील महिलांना विरोध दर्शविला आहे. नगरसेविका वैभवी दुसाणे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी दि. 14 जूनपासून आंदोलन सुरु केले आहे.

दररोज सायंकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान हॉटेल कुणालच्या समोर बसून महिला भजन आंदोलन करीत आहेत. दि. 15 जून रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. मनोहर आंचुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

त्यावेळी महिलांनी अधिक्षकांना घेराव घालून दुकानाबाबत कैफियत मांडली. यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाने डॉ. आंचाळे यांना निवेदन दिले.

निवेदनावरील स्वाक्षर्‍यांची खात्री करुन मतदान घेतले जाईल व 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यास दारु दुकानाची परवानगी रद्द करण्यात येईल असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या आंदोलनांतर्गत महिलांनी रास्तारोकोही केला. या आंदोलनात नगरसेविका वैभवी दुसाणे, प्रतिभा चौधरी, मेघल चौधरी, मनिषा चौधरी, मनिषा पाटील, रश्मी पंचभाई, उषा सराफ, वैशाली पिंगळे, मिनल पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्याच दिवशी भजन आंदोलनही करण्यात आले. दुकान स्थलांतरीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.

आंदोलकांशी चर्चा
न्यू कुणाल बिअरबार परिसरातून हटविण्यासाठी प्रमोदनगर परिसरातील महिलांनी चार दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे.

रोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत बार समोर महिला भजन आंदोलन करतात. शुक्रवारी भजन आंदोलन करतांना महिलांशी हॉटेल संचालकाने चर्चा केली.

यावेळी हॉटेलच्या प्रवेशद्वारा ऐवजी महिलांनी बाजूला आंदोलन करावे त्यासाठी मंडपाची व्यवस्था करुन देतो असे त्यांनी सांगितले.

मात्र महिलांनी जोपर्यंत बिअरबार तेथून हटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला व भजन म्हटले.

यावेळी संचालकांनी बार हटविण्यास तयार आहोत त्यासाठी प्रक्रिया करावी लागेल त्याला कालावधी लागेल असे सांगितले. मात्र आंदोलनकर्त्यांनी याकडे लक्ष दिले नाही व आंदोलन सुरुच ठेवले आहे. यावेळी आंदोलनकर्ते आणि हॉटेल संचालकांमध्ये वादही झाला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे साकडे
धुळे शहरातील देवपूर परिसरातील जयहिंद कॉलनी, आनंदनगर, मयुर कॉलनी, प्रमोदनगर, प्रोफेसर कॉलनी, वाडीभोकर रोड, भरतनगर, एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, रामनगर या ठिकाणी दारु दुकानासह बिअर शॉपीला परवाने मिळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज करण्यात आले आहे.

ही परवानगी देवू नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक डॉ. मनोहर आंचुळे यांना साकडे घालण्यात आले. यावेळी प्रतिभा चौधरी, नगरसेवक कमलेश देवरे, रमेश बोरसे, नागसेन बोरसे, अजबराव बोरसे, सुरेश भदाणे, सागर चौधरी, मधुकर पाटील, मिलिंद मुडावदकर, तारांचद पाटील, केदार जोशी आदी उपस्थित होते.

अवैध दारुविक्री बंद करा – लोकसंग्राम
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरुन दारु दुकान, बिअरबार बंद करण्यात आली आहे. परंतू त्यानंतर शहरातील चौकाचौकात अवैध दारु मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.

मद्यपी शहरातील मुख्य रस्त्यांवर, कॉलनी परिसरात, ओपन स्पेस, सोडागाडी, अंडाभुर्जी गाडी, सरकारी कार्यालयांचे आवार, पांझर नदीकाठ या ठिकाणी दारु पितात.

मद्यपी रस्त्यावर लघुशंका करतात, महिलांची व तरुणीची छेड काढली जाते. त्वरीत सार्वजनिक जागेवर दारु पिणार्‍यांवर कारवाई करावी व अवैध दारुविक्री बंद करावी अशी मागणी लोकसंग्रामचे तेजस गोटे, प्रशांत भदाणे, अमोल सूर्यवंशी, संजय बगदे, सचिन कोतेकर, अविनाश लोकरे, मयुर खैरनार, भोला गोसावी, वामन मोहिते, सचिन कोतेकर, योगेश सोनवणे, सचिन सुर्यवंशी, बंटी अहिरे, बाळू शेंडगे, दीपक जाधव, नाना पाठक, संजय सुतार, प्रवीण राणा आदींनी केले आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*