Type to search

धुळे

आदेश अडीच लाखाचा, पुरवठा एक लाख लिटर पाण्याचा

Share

कापडणे । कापडणे येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची तारांबळ होत असतांना प्रशासनाने आपल्याच आदेशाला फाटा दिला आहे. दोन लाख 43 हजार 330 लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने टँकरव्दारे तेवढा पुरवठा करण्यासंदर्भात आदेश असतांना सध्या येथे केवळ एक लाख दहा हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे.

बारा हजार लिटरचे दोन टँकर प्रत्येकी दहा फेर्‍या मारतील असे आदेश असतांना येथे 22 हजार लिटर क्षमतेचा एक टँकर येथे केवळ चार किंवा पाच फेर्‍या मारत आहे. शासन दरबारी पाठपुरावा करुनही आठ दिवसांपासुन हिच परिस्थिती आहे.

पंधरा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा यापुढे बंदच होतो की काय, अशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याने येथे टँकर सुरु मागणी करण्यात आली होती. येथील पाणीटंचाई निवारणार्थ येथील तिलोत्तमा शरद बोरसे, दगाजी बुधा मोरे, अशोक यादवराव माळी, कुसुमबाई नवल बडगुजर, प्रकाश बुधा बडगुजर यांच्या खाजगी बोअरवेलवरून टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रा.पं.तर्फे सादर केला गेला, या प्रस्तावास शासन स्तरावरुन दहा दिवसांपुर्वी मंजुरी मिळाली. दि.7 जुन पासुन प्रत्यक्षात टँकरने पुरवठाही सुरु झाला. टँकरची मदत घ्यावी लागण्याची ही कापडण्यासाठी पहिलीच वेळ आहे. कापडणे गावासाठी 12 हजार लीटर क्षमतेचे दोन टँकर सुरु करावेत असे स्पष्ट आदेश मंजूरीच्या पत्रात असतांना येथे 22 हजार लिटर क्षमतेचा एक टँकर देण्यात आला आहे.

पाणी कमी अन् राजकारणच जादा- पाणीप्रश्नावरुन येथील दोन्ही गटांनी कमी-अधिक प्रमाणात राजकारण करुन घेतले. येथे टँकर सुरु झाल्यानंतरही सोशल मिडीयावर भरभरुन पोष्ट फिरल्या. प्रत्यक्षात टँकरच्या संख्येच्या बाबत मात्र दोन्ही गटात फारसे सोयरसुतक झाले नाही. ग्रा.पं.तील काही पदाधिकार्‍यांनी हा मुद्दा प्रांतधिकार्‍यांच्या लक्षात आणुन दिला व टँकर वाढविण्याची मागणी लावुन धरली आहे, यात दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपले राजकीय वजन वापरत तो प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच सव्वा दोन कोटीच्या पाणीयोजनेचाही सोक्षमोक्ष लावण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
अडीच लाख लिटर पाण्याची आवश्यकता- कापडण्यातील 17 हजार 225 लोकसंख्येसाठी, दरडोई 20 लिटर याप्रमाणे गावास एकुण तीन लाख 44 हजार 500 लिटर पाणी आवश्यक आहे.

तर एक हजार 932 मोठ्या जनावरांना दरडोई 35 लिटर प्रमाणे, एकुण 67 हजार 620 लिटर पाणी आवश्यक आहे तर 865 लहान जनावरांसाठी दरडोई चार लिटर प्रमाणे, एकुण तीन हजार 460 लिटर पाणी लागणार आहे. सर्व मिळुन गावासाठी एकुण पाण्याची आवश्यकता चार लाख 15 हजार 580 लिटर आहे, यातील एक लाख 72 हजार 250 लिटर पाणी विविध उपाय योजनांमधुन मिळत असल्याने गावास सध्या दोन लाख 43 हजार 330 लिटर पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी 12 हजार लिटर क्षमतेच्या दोन टँकरने प्रत्येकी दहा फेर्‍या दररोज होणार असल्याचे शासकीय पत्रात म्हटले आहे.

प्रत्यक्षात मात्र 22 हजार लिटरचा एक टँकर चार किंवा पाच फेर्‍या मारत असल्याने, गावास केवळ एक लाख दहा हजार पाण्याचा पुरवठा करत आहे. येथील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही पाण्याची तुट शासनाने भरुन काढणे गरजेचे आहे. जास्तीत-जास्त दि.30 जुन 2019 पर्यंत तत्पुर्वी टंचाई परिस्थितीत असेपर्यंत हे अधिग्रहीत करण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी कळविले आहे. यातील आठ दिवस तर प्रशासकीय प्रक्रीयेतच गेल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!