Thursday, April 25, 2024
Homeधुळेविष्णू भागवत पोलिसांच्या स्वाधिन

विष्णू भागवत पोलिसांच्या स्वाधिन

धुळे  –

माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑप.च्या सोसायटीच्या माध्यमातून तब्बल 1461 ठेवीदारांना 10 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेला मुख्य सुत्रधार विष्णू रामचंद्र भागवत यास अखेर धुळे आर्थिक गुन्हाशाखेच्या स्वाधिन करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशचे पोलीसही त्यास ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील होते.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील गंवड गावचा रहिवाशी असलेल्या विष्णू भागवतने माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को.ऑप.च्या सोसायटीच्या माध्यमातून केवळ धुळे, नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर इतरत्रही फसवणूक केली आहे. याआधी नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल होवून त्यास पोलीस कोठडी मिळाली होती.

परवा कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र त्याच्या विरुध्द धुळे आणि हिमाचलमध्येही गुन्हे दाखल असल्याने दोन्ही ठिकाणचे पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील होते. परवा गुरुवारी कारागृहातील कैदी बंदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे त्याचा ताबा मिळू शकला नाही. मात्र धुळे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरिक्षक हेमंत बेंडाळे यांनी त्यास आपल्या ताब्यात द्यावे म्हणून नाशिक न्यायालयात अर्जही केला होता. न्यायालयाने तसे निर्देशही दिले होते.

म्हणूनच तपास अधिकारी बेंडाळे यांच्या पथकातील रविंद्र शिंपी, मुकेश बाविस्कर, भूषण जगताप हे भागवत यास ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये ठाण मांडून होते. मात्र त्याचा ताबा धुळे पोलिसांना मिळतो की, हिमाचल प्रदेशच्या पोलिसांना हे निश्चित नव्हते. अखेर काल दुपारनंतर भागवत यास धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आल्याने सायंकाळी त्यास धुळ्यात आणण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या