Type to search

धुळे

पाच रुपयाच्या नोटाबंदीच्या अफवेने गोंधळाची स्थिती

Share

तर्‍हाडी । शिरपूर तालुक्यात ग्राहकांसह विविध किरकोळ व्यवसायिक पाच रुपयांची नोट घेण्यास नकार देत आहेत. रिजर्व बँकांकडून पाच रुपयांची नोट बंदीची अधिसूचना नसतांनाही सर्रासपणे किरकोळ व्यवसायिक व ग्राहक पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याचे सांगून नोट घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वघाडी, विखरण, वरूळ, भटाणे,
तर्‍हाडी आदी परिसरातील बहुतांश किरकोळ व्यावसायिक, किराणा दुकानदार हे पाच रुपयांची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहेत. पाच रूपयांची नोट चलनातून बाद झाली आहे अशी अफवा परिसरात पसरल्याने व्यावसायिकांकडून या नोटा घेण्यास नकार दिला जात आहे. परंतू यामुळे गोरगरीब जनता वेठीस धरली जात असून बहुतेकदा व्यवसायिक व ग्राहकांमध्ये पाचची नोट देवाण, घेवाण वरून वाद निर्माण होतांना दिसून येत आहे.

यापूर्वी देखील अशीच अफवा 10 रुपयांच्या नाणे बंद झाल्या बाबत पसरली होती. यामुळे बहुतेक जण नाणे घेण्यास नकार देत होते.दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेप्रमाणे पाच रुपयांची नोट चलनातून बंद झाल्याची ही अफवाच असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत बँक प्रशासनाने ग्रामीण भागासह शहरीभागातही व्यावसायिकांना जनजागृती करण्याची गरज आहे.

पाच रुपयांच्या काही नोटा जीर्ण झाल्यामुळे अनेक जण ती नोट नाकारू लागले होते. त्यातच चांगल्या पाच रुपयांच्या नोटाही स्वीकारणे नागरिक व व्यावसायिकांनी बंद केले. चलनात असलेल्या नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे अनेकांजवळ पाच रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत.

नोट नाही घेतली तर कारवाई
चलनात असलेली नोट स्वीकारण्यास नकार दिल्यास रिजर्व बँकेच्या नियमानुसार आयपीसी सेक्शन 124 ए अंतर्गत संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करता येईल. त्यामुळे बंद नसताना पाच रुपयांची नोट न स्वीकारणे व्यावसायिकांना महागात पडू शकते.

रिजर्व बँकेने पाच रुपयांच्या नोटाबंदी संदर्भात कोणताच आदेश जारी केलेला नाही. आम्ही पाच रुपयांच्या नोटा स्वीकारत आहोत. त्यामुळे नागरिक व व्यापार्‍यांनी देखील पाच रुपयांची नोट स्वीकारावी.
अतुल शिंदे
व्यवस्थापक,

महाराष्ट्र ग्रामीण बँक, वरूळ
मी माझ्या नातवाला कुरकुर्‍यांचे पाकिट आणण्यासाठी पाच रुपयांची नोट दिली होती. मात्र, तो परत आला. पाच रूपयांची नोट बंद झाली असल्याचे सांगून दुकानदाराने कुरकुरेचे पाकिट दिले नाही असे त्याने सांगितले.
निंबा दिंपचद भामरे

ग्राहक
जेव्हा हातगाडी, चहा, पानटपरी वाले यांच्याकडून घाऊक व्यापारी पाचच्या नोटा स्विकारत नाही. म्हणून आम्ही ग्राहक कडून घेत नाही. ग्राहकांकडे पाचच्या नोटा जिर्ण झालेल्या असतात. आमच्या कडून जर घाऊक व्यापार्‍याने पाचच्या नोटा घेतल्याच तर आम्हाला ग्राहकाकडून पाचच्या नोटा घेण्याला हरकत नाही.
खैरनार पान सेंटर
तर्‍हाडी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!