तापी योजना सुसज्ज करण्याचे निर्देश

0
धुळे । दि.19 । प्रतिनिधी-शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नकाणे तलावात 40 दलघफू एवढाच पाणीसाठा आहे तो केवळ 15 दिवस पुरेल. त्यामुळे तापी योजनेतून पाणीपुरवठा शहराला करावा लागणार आहे म्हणून तापी पाणीपुरवठा योजना सुसज्ज करा, असे निर्देश महापौर सौ.कल्पना महाले यांनी दिले.
उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यासंदर्भात व करावयाच्या उपाययोजनांबाबत दि.19 रोजी संबंधित अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यावेळी महापौर महाले या बोलत होत्या.
शहरास सद्य:स्थितीत तापी पाणीपुरवठा योजना, नकाणे, डेडरगाव तलाव येथून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत नकाणे तलावात 40 व डेडरगाव तलावात 80 दलघफू एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.
नकाणे तलावातील सदर पाणीसाठा 15 दिवस पुरेल एवढा आहे. भविष्यात पर्जनवृष्टी न झाल्यास धुळे शहराच्या उर्वरित भागात तापी योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

त्यादृष्टिने कार्यवाही आतापासून सुरू करावी अशी सुचना महापौर सौ.कल्पना महाले यांनी यावेळी दिल्या. तसेच भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यादृष्टिने कृती आराखडा व उपाययोजना करण्याबाबतचे आदेश दिले.

अक्कलपाडा धरणातून हरणमाळ तलावात पाणी घेवून नकाणे तलाव भरणे शक्य आहे. त्यादृष्टिने संबंधित विभागाकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

तसेच कॅनालमधील गळत्या व निर्माण झालेली झाडेझुडूपे काढून कॅनोलची स्वच्छता, आवश्यक ती दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागास पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.

तसेच तापी योजनेवरील पंपाची स्थिती, शुध्दीकरण व्यवस्था मजबूत करण्याबाबत आदेश करण्यात आले. आपत्कालिन परिस्थितीत राखीव असलेल्या पंपाची निगा व दुरुस्ती, वितरण वाहिनीवरील आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करण्याबाबत सूचना महापौरांनी दिल्या.

शहरातील मध्यवर्ती भागातील असलेल्या बडगुजर जलकुंभाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन दिवसात सदर काम पूर्ण करण्याबाबत आणि नाटेश्वर व जामचा मळा येथील जलकुंभाच्या उर्वरित कामाबाबतही संबंधित ठेकेदाराशी चर्चा करुन काम तातडीने सुरु करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

युआयडीएसएसएमटी अंतर्गत असलेल्या कामांबाबतही आढावा घेवून त्याबाबत माहिती या बैठकात देेण्यात आली.
या बैठकीला नगरसेवक चंद्रकांत सानार, उपायुक्त जाधव, अभियंता कैलास शिदे, प्र.नगररचनाकार पी.डी.चव्हाण, कनिष्ठ अभियंता एन.के.बागूल, ओव्हरसियर सी.एम.उगले, एस.बी.विसपुते, हेमंत पावटे आदी उपस्थित होते.

उपलब्ध असलेला पाणीसाठा लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच नळांना तोट्या बसवून घेण्याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापौर सौ.कल्पना महाले यांनी यावेळी केले.

 

LEAVE A REPLY

*