खान्देशच्या रेल्वेची वाटचाल संघर्षाकडून हर्षाकडे !

0
धुळे । दि.29 । प्रतिनिधी-अटलजींच्या मंत्रीमंडळात असतांना देखील मी धुळ्यात आलो होतो. त्यानंतर आधी काहीतरी चांगल करुन दाखवेल आणि मगच धुळेकरांच्या भेटीला येईल असे मी ठरविले होते.
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची कर्तव्यपूर्ती केल्यानंतर मी नतमस्तक होण्यासाठी आलोे आहे. कोकणानंतर माझा आवडता प्रांत खान्देश असून खान्देशची रेल्वेची वाटचाल आता संघर्षातून हर्षाकडे सुरु झाली आहे.
या प्रकल्पानंतर धुळ्याचा चेहरा-मोहरा बदलेल. एक मोठी बाजारपेठ म्हणून धुळे नावारुपाला येईल. अनेक गोष्टी धुळ्यात आणणार आहे. मात्र त्या केल्यानंतरच सांगेल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभु यांनी केले.

विविध संस्था आणि संघटनातर्फे ना. प्रभु यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खा.ए.टी.पाटील, आ.अनिल गोटे, आ.स्मिता वाघ, महापौर सौ.कल्पना महाले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ. जितेंद्र ठाकूर, सौ.मंजुळा गावित, बबन चौधरी, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, किशोर सिंघवी आदी उपस्थित होते.

ना.सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितले की, धुळेकर खूप प्रेमळ आहेत. ओतून जीव लावतात. मनापासून भावना व्यक्त करतात. विकास करण्यासाठी सरकार संवेदनशील असावे लागते.

देशातील 90 टक्के लोकांनी मोदी सरकारचे धोरण स्विकारले आहे. एक लाख 50 हजार कोटी रुपये मी देशातील रेल्वे प्रकल्पांच्या विकासासाठी आणले असून आठ लाख 56 कोटींचे प्लॅन आखले आहेत.

देशातील शंभर रेल्वे स्टेशन एअरपोर्टप्रमाणे विकसीत करणार असून 40 हजार डबे पूर्णपणे बदलले जाणार आहेत. रोज 20 कि.मी.चे रेल्वे रुळ तयार होतील, अशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

ना.डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले की, येत्या दोन-तीन महिन्यात इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन चार ते पाच महिन्यात या प्रकल्पाच्या भूमिपुजनासाठी ना.सुरेश प्रभू पुन्हा धुळे जिल्ह्यात येतील.

याबरोबरच इंडस्ट्रीयल कॉरिडॉर देखील होणार आहे. येत्या तीन वर्षात जिल्ह्याला 25 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यावेळी बोलतांना जयकुमार रावल यांनी सांगितले की, 1968 पासून ना.सुरेश प्रभू यांचे धुळे शहराशी नाते आहे.

प्रभु यांनी धुळ्याशी ऋणानुबंध आजही कायम ठेवले आहेत. कारण ना.प्रभू यांची बहिण या धुळे शहरात आहे. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाच्या रूपाने त्यांनी जिल्ह्याला भाउबिजेची भेट दिली आहे.

इंदूर-मनमाड प्रकल्पामुळे नरडाणा शहराला भूसावळ शहरा इतके महत्व प्राप्त होणार आहे, असेही ना.रावल म्हणाले.

डॉ.भामरे समाजाचे दुर्धर आजार दूर करतील


केंद्रामध्ये ना.डॉ.सुभाष भामरे यांच्या रुपाने सातपुडा हिमालयाच्या रक्षणासाठी गेला आहे. डॉ.भामरे हे उत्कृष्ट शल्यचिकित्सक आहेत.

त्यामुळे दुर्धर रोगावर मात करण्याची कला त्यांनी आत्मसात केली असून समाजातील सर्व दुर्धर आजार ते संपवून टाकतील. देशाचे संरक्षण करतांना धुळ्याचेही रक्षण करतील अशी खात्री ना.प्रभू यांनी यावेळी दिली.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत राजकारण करणार्‍या जिल्हा बँकेवर मोर्चे काढा !


राज्य शासनाने कर्जमाफी केली. शेतकर्‍यांना तातडीचे दहा हजार रुपयाचे कर्जवाटप होणे गरजेचे असतांना अद्यापही शेतकर्‍यांना पैसे मिळालेले नाहीत. सरकारने निर्णय घेतल्यानंतर बँकांकडे याद्या पाठविल्या आहेत.

पात्र लाभार्थ्यांची माहिती पाठविली आहे. मात्र काँग्रेस प्रणीत जिल्हा बँका यात राजकारण करीत आहेत. सरकारने निर्णय घेतलेला असतांना शेतकर्‍यांना कर्ज देत नाहीत.

त्यामुळे आपण आज सत्तेत असलो तरी संघर्ष करावा लागणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बँकांना जाग आणण्यासाठी मोर्चे काढावेत आणि शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी व निर्णय घेवून देखील शेतकरी कर्जापासून वंचीत राहत असल्याचे पत्रक आज प्रसिध्दीला दिलेले होते.

त्या पार्श्वभूमीवर ना.रावल यांनी काँग्रेसला आज जोरदार चपराक देतांनाच भाजपा कार्यकर्त्यांना यासाठी संघर्ष करण्याचे
आवाहन केले.

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*