‘प्रभू’ तुम्ही दयाळू…

0
विलास पवार,धुळे । दि.28-अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग पुर्णत्वाला यावा म्हणून धुळेकर स्वप्न पाहत आहेत.
या प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजूरी देवून निधीची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात प्रकल्पाचे भूमिपूजन कधी होते, याची प्रतिक्षा कायम आहे.
या प्रकल्पासाठी प्रथमच केद्रीय रेल्वेमंत्री प्रत्यक्षात धुळ्यात येवून यासंदर्भात आढावा बैठक घेत आहेत.यामुळे आशा पल्लवित झाली असून ‘प्रभूं’नी धुळेकरांच्या स्वप्नातल्या या रेल्वेमार्गाची प्रत्यक्षात सुरुवात कधी होईल, याची घोषणा करुन धुळेकरांवर आतातरी ‘कृपा’ दाखवावी, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय रेल्वे खाते महाराष्ट्राकडे असून महाराष्ट्राच्या दळणवळणात अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणार्‍या आणि धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार्‍या या प्रकल्पाचे काम थेट मार्गी लावण्यासाठी ना. सुरेश प्रभू खूप काही करू शकतात.

शंभर वर्षापेक्षा अधिक काळ गेला, या प्रकल्पाचे स्वप्न पाहत अनेक पिढ्या काळाच्या पडद्याआड गेल्यात. मात्र त्यांना हा मार्ग पहायला मिळाला नाही.

केवळ चर्चा, सर्व्हेक्षण यामध्येच प्रकल्पाची ‘रेल्वे’ अडकली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी लढणार्‍या संघटनांनी आपापल्या पध्दतीने पाठपुरावा केला.

परंतु आदिवासीबहुल जिल्हा असूनही यापुर्वीच्या सरकारांनी या प्रकल्पाचा प्रश्न गांभीर्याने कधी सोडविला नाही. निवेदने आणि भेटीगाठी पुरताच दिल्लीकरांनी या रेल्वेमार्गाला महत्व दिले.

मात्र मोदींच्या कृपेने हक्काचे रेलवेमंत्री मिळाले असून ना. सुरेश प्रभू हे धुळेकरांना आपलेसे वाटू लागले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांनी वेळोवेळी या संदर्भातील पाठपुराव्याला मिळालेले यश आणि नितीन गडकरी यांनी धुळेकरांसाठी घेतलेला पुढाकार प्रकर्षाने लक्षात आणून दिला.

रेल्वेच्या प्रश्नावर श्रेयाची लढाई जिल्ह्यात मोठी आहे.या प्रकल्पाचे श्रेय कोणी घ्यावे, कोणी संघर्ष केला अशा अनेक विषयांवर स्पर्धा आणि चढाओढ आहे.

एवढेच काय एकाच पक्षाचे आमदार, खासदारदेखील वेगवेगळ्या पातळीवर भूमिका मांडतात. आ. अनिल गोटे आणि ना. डॉ. सुभाष भामरे या एकाच पक्षातील दोन आमदारा-खासदारांमध्ये याच विषयावर झालेली पत्रकबाजी धुळेकरांनी पाहीली आहे.

पण या दोन्ही नेत्यांचा एकच ध्यास आहे. तो म्हणजे हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पुर्ण झाला पाहीजे. ना.प्रभूंनी यात दाखविलेला रस आणि धुळेकरांना विश्वास देण्यासाठी घेतलेली रेल्वे मार्गाची आढावा बैठक हा एक त्यासाठीच ‘सुवर्णक्षण’ मानला जात आहे.

आता या रेल्वेमार्गाचे प्रत्यक्षात काम कधी सुरु होईल, याची घोषणा ना. प्रभूंनी करावी व धुळेकरांच्या विकासाला आधार ठरणार्‍या या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न सोडवावा. त्याचप्रमाणे रेल्वेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला आणखी काय प्रकल्प देता येईल याचाही विचार व्हावा!

 

LEAVE A REPLY

*