Type to search

धुळे

अभय कोटेक्सच्या कामगारांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता

Share

सोनगीर । वार्ताहर – नरडाणा एमआयडीसीत अभय न्यूट्रीशियन प्रा.लि. अर्थात अभय कोटेक्स या नावाने पशुखाद्य निर्मिती करणार्‍या कंपनी व्यवस्थापनाने गेल्या सात वर्षाच्या काळात नरडाणा येथील उद्योगात सातत्याने मालाची निर्मिती होत असताना ती स्वतःच्या, अन्य कंपनी फर्मच्या माध्यमातून विक्री करून येथील अभय न्यूट्रीशियन या कंपनीच्या कामगारांना वेतन न देता कंपनी दिवाळखोरीत काढण्यासाठी अनेक प्रयोग केले आहे. यामुळे सुमारे दीडशे ते दोनशे कामगारांचे भविष्य पणाला लागले आहे. तसेच या कंपनी व्यवस्थापनाने शेतकर्‍यांकडून पालन-पोषणासाठी घेतलेल्या गायींची उपासमार होऊन त्यांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत आठ ते दहा गायी मृत्युमुखी पडल्याने त्यांना कंपनीच्या आवारातच पुरण्यात आले आहे. यामुळे कंपनीच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सदर संपास पाच दिवस उलटूनही प्रशासनाने याबाबत दखल घेतलेली नसून जिल्हाधिकार्‍यांनी या प्रश्नी त्वरित लक्ष घालावे, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे पत्रक दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

नरडाणा औद्योगिक वसाहतीतील जालना येथे अभय न्यूट्रीशियन प्रा.लि. या कंपनीने प्लॉट नं. टी-9 बाभळे फाटा येथे पशुखाद्य निर्मितीचा उद्योग उभा केला. सुरुवातीला कंपनीच्या बाबी नियमित असल्याने परिसरातील बेरोजगारांनी या कंपनीत रोजगाराला प्राधान्य दिले. परंतु, मुळातच चांगला हेतू डोळ्यासमोर न ठेवता काम करणार्‍या या जालना येथील मूळ नोंदणीकृत अभय न्यूट्रीशियन प्रा.लि. या कंपनीने बाभळे येथे अभय कोटेक्स नावाने उत्पादने सुरू केली. सुरुवातीला काम करणार्‍या सुमारे 130 कर्मचार्‍यांना 2013 मध्येच कायम केले.

परंतु, संघटनेने वारंवार तगादा लावल्यानंतर 2018 मध्ये त्यांना कायमचे आदेश देण्यात आले. या काळात कर्मचार्‍यांकडून अत्यल्प वेतनात काम करून घेतले. विशेष म्हणजे या कंपनीत नियमित्त मालाची निर्मिती होत असताना कायम कर्मचार्‍यांना कामावर न घेण्याचा हेतूने कंपनी दिवाळखोरीत काढण्याचे षड्यंत्र रचले. बाभळे येथे उत्पादित होणारा माल ऋषी आय दाल प्रा.लि. नाशिक या नावाने त्याची विक्री करण्यात आली. हा माल इंदूर तसेच प्रितमपूर येथे विकण्यात आला. कंपनी चालकाने सुरुवातीला पशुखाद्यात क्लस्टरची मात्रा वाढवल्याने हे पशुखाद्य खाल्ल्याने अनेक पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

या कंपनी प्रशासनाने जिल्हा पातळीवरील अन्न औषध प्रशासन व कामगार अधिकारी यांच्याशी संगनमत करून हा गैरव्यवहार केलेला आहे. पशुंचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी आल्याने उत्पादनाची वेळोवेळी नावे बदलण्यात आली. पशुखाद्यामध्ये क्लस्टरचा वापर वाढवून निकृष्ट दर्जाची उत्पादने बाजारात आणली. कंपनीने इटीपी प्रोसेस न केल्याने दूषित पाणी थेट परिसरात टाकले. अर्थात त्यामुळेही जनावरांचा जीव गेला. माल निर्मितीत हेराफेरी करताना सोडियम हायड्रॉक्साईडसारखे मिश्रण करून बॉयलरसाठी लागणारे जळाऊ साहित्यानेदेखील पशुखाद्य निर्माण केल्याची माहिती कर्मचार्‍यांकडून प्राप्त झाली आहे. तसेच बँकांना फसवण्यासाठी देवभाने येथील गोडावूनमध्येदेखील सीएसएम, गोभक्ती, एपी 300 अशा नावाने माल ठेवल्याचे दाखवून बँकांकडून कर्ज घेतले.

प्रत्यक्षात हा कंपनीनिर्मित माल नसून क्लस्टरचे मटेरियल आहे. हे साहित्य बॉयलरच्या कामासाठी आणलेले असताना त्याचा चुकीचा उपयोग केला आहे. अडचणीतील शेतकर्‍यांना गोशाळेच्या नावाने पालन-पोषणाची जबाबदारी घेऊन कंपनी व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणात गायी घेतल्या आहेत. परंतु, कंपनी बंद करताना आजही दीडशे ते दोनशे गायी कंपनीच्या आवारात असून त्यांना खाद्य नसल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात कर्मचार्‍यांचा दिवाळी बोनस, गेल्या वर्षीचा दोन महिन्यांचा साठ टक्के पगार, तसेच चालू वर्षातील दोन महिन्यांचा पगार कर्मचार्‍यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी वेतनासाठी आंदोलन सुरू केले आहे.

यातील काही कर्मचार्‍यांची प्रकृती गंभीर असून अद्याप कामगार अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी दखल घेतलेली नाही. या कामगारांना विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून तरीदेखील प्रशासनाला त्याची जाग येत नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित संबंधित कंपनी प्रशासनाविरुद्ध कारवाईचे आदेश द्यावेत, हेतूतः कंपनीला दिवाळखोरीत ढकलणार्‍या कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, कर्मचार्‍यांना न्याय मिळावा तसेच कंपनी व्यवस्थापनाने ताब्यात घेतलेल्या निष्पाप गायींना मृत्यूपासून वाचवावे, अशी मागणी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पाटील यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!