बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे तालुक्यातील लामकानी येथील बनावट दारूचा कारखाना आज पहाटे येथील पोलिसांनी छापा टाकून उध्वस्त केला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान तेथे ब्रँडेड दारूसारखीच मात्र बनावट व आरोग्यास धोकादायक दारू बनविली जात होती.

येथील पोलिस ठाणेअंतर्गत येणार्‍या गावांमध्ये पोलिसांची गस्त सुरू असतांना नवलाणे ते लामकानी रस्त्यावर नवलाणेजवळ दोन मोटारसायकली व चार जण दिसले. त्यांच्याजवळील गोणीत बनावट दारूच्या बाटल्या भरलेल्या आढळून आल्या. त्यांची विचारपूस केली असता पोलिसांनी लामकानी रुदाणे रस्त्यावरील निलेश रमेश पाटील यांच्या शेतात छापा टाकला.

बनावट दारूच्या बाटल्या, दारू बनविण्याचे साहित्य, ड्रम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. एका विहीरीजवळ भुयार करून तेथे दारू तयार केली जात होती. या प्रकरणी संशयित समाधान भिका धनगर, ज्ञानेश्वर शांतिलाल पाटील, निलेश रमेश पाटील (सर्व रा. लामकानी ता. धुळे), रोहित राजू पटाईत, शशिकांत मच्छिंद्र मगर (दोन्ही रा. भीमनगर, धुळे), भैय्या बापू निकम (रा. सैताळे) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील तसेच पथकातील शामराव अहिरे, अजय सोनवणे, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, विवेक वाघमोडे, अतुल निकम आदींच्या पथकाने केली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com