सोनगीर येथील दारु दुकान बंद करा !

0
सोनगीर । दि.20 । वार्ताहर-येथील वार्ड क्रमांक चारमधील भरवस्तीतील देशी दारूचे दुकान कधी बंद करता तेवढेच बोला? आम्हाला नेमकी अंतिम मुदत सांगा, असा संतप्त सवाल करीत आता आमची सहनशक्ती संपली आहे.
दुकान बंद करा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू. असा इशारा येथील महिला दक्षता समिती सदस्या व हिंदू- मुस्लीम महिलांनी आज ( ता. 20) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक डी. एम. मून यांना दिला.
महिलांनी विविध प्रश्नांची सरबत्ती करीत श्री. मून यांना धारेवर धरले. 15 दिवसात देशी दारू दुकान बंद करतो असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा अन्यत्र हटवावे या मागणीचे निवेदन महिलांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनाही दिले. महिलांचे मतदान घेऊन निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

आज दुपारी दीडच्या सुमारास येथील हिंदू – मुस्लीम महिला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात दाखल झाल्या. मुख्य अधिकारी मिळून न आल्याने त्यांनी कार्यालयीन अधीक्षक मून यांना निवेदन दिले.

महिलांच्या रुद्रावतार व अंतिम मुदतीचा आग्रह पाहून त्यांना बोलणे सुचेना. त्यामुळे त्यांनी 15 दिवसात बंद करतो असे आश्वासन देऊन सुटका करून घेतली.

त्यानंतर महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारींकडे वळला. दरम्यान देशी दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा व ग्रामस्थांचा एल्गार पहाता लवकरच दारू दुकान बंद न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

येथील भर वस्तीतील हे देशी दारूचे दुकानामुळे दारूड्यांचा त्रास सहन करीत ग्रामस्थ कसेबसे राहात आहेत..या देशी दारू दुकानापासून अवघे दहा फुटांवर अंगणवाडी केंद्र आहे.

समोरच महिला शौचालय आहे. आजूबाजूला सभ्य लोकांची वस्ती आहे. लोकांच्या घरासमोर दारुडे मोटरसायकल लावतात त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो.

शिवाय शौचालयाकडे जाणार्‍या व येणार्‍या महिलांकडे बघून अश्लील हावभाव करतात. दारुड्यांचे भांडण, गलिच्छ शिवीगाळ हे नित्याचे आहे.

त्यामुळे नेहमी दारुडे व परिसरातील रहिवासींमध्ये वादविवादाचे प्रसंग घडतात. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून 220 मीटरच्या आत दारू दुकानास बंदी घातली असूनही येथे सर्रास आदेशाची पायमल्ली होत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दारू दुकानास सुट का दिली? कोणत्या पध्दतीने मोजमाप केले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

याबाबत सखोल चौकशी करून भरवस्तीतील देशी दारूचे दुकान बंद करावे किंवा अन्यत्र हटवावे तसेच दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

यावेळी पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा शकुंतला चौधरी, सदस्या संगिता चौधरी, प्रतिभा लोहार, जयश्री लोहार, नीता परदेशी, सुलभा ईशी, हमीदाबी शेख, झुबेदाबी शेख, ज्योती देवरे, मुमताज बी खाटीक, शहनाजबी शेख, ग्रामपंचायत सदस्य मुन्ना शेख, आरीफखाँ पठाण,अनीस कुरेशी किशोर पावनकर आरिफ ऐस पठान अशरफ पठान आसिफ सय्यद इमरान शेख पप्पू कुरेशी हनीफ मिस्तरी इकबाल खाटिक व अनेक महिला उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

*