शिरपूर फाट्यावर बॅटरीचे गोदाम फोडले : 83 हजारांचा मुद्देमाल लंपास

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-शिरपूर शहरानजिक असलेल्या फाट्यावरील बॅटरीचे गोदाम फोडून अज्ञात चोरट्याने 83 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शिरपूर शहरात राहणारे मुजावर कॉम्प्लेक्स येथे मोहम्मद इब्राहिम मोहम्मद हुसेन अन्सारी यांचे बॅटरी गोदाम शिरपूर फाट्यावर आहे.

अज्ञात चोरट्यांनी दि.23 जुलै रोजी सकाळी आठ वाजता ते 24 जुलैच्या दहा वाजेदरम्यान गोदाम फोडून 40 हजार रुपये किंमतीच्या दहा बॅटर्‍या, 25 हजार रुपये किंमतीच्या पाच बॅटर्‍या, 5 हजार 500 रुपये किंमतीच्या सहा बॅटर्‍या तीन हजार 500 रुपयांच्या बॅटर्‍या आणि आठ हजार 500 रुपये किंमतीच्या 18 बॅटर्‍या अशा 82 हजार 500 रुपये बॅटर्‍या चोरुन नेल्या. याबाबत अन्सारी यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनावरांची वाहतूक – नागपूर-सुरत महामार्गावरुन जीजे एव्ही 0923 क्रमांकाच्या आयशर गाडीत आठ मोठ्या गायी व दोन वासरे कोंबून वाहतूक करतांना गंगापूर फाट्याजवळ आढळून आले. वाहनात जनावरे कोंबून भरल्यामुळे त्यांना इजा झाली. याबाबत रज्जाक सिकंदर पटवे यांनी साक्री पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम 160 चे कलम 11 डी (एफ) सह मोटार वाहन कायदा 83/177 प्रमाणे अरविंद खिमजीभाई खोडईविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

युवक ठार – रोजगाराच्या निमित्ताने सुरत शहरात वास्तव्यास असलेल्या म्हसदी, ता.साक्री येथील शाम नंदलाल देवरे (वय 17) या युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. हा युवक गेल्या दोन वर्षापासून सुरत शहरात वास्तव्याला होता. कामानिमित्त शाम हा रेल्वेस्थानकाकडे जात असताना त्याने रेल्वेचा रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धावत्या रेल्वेने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्यावर म्हसदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*