शिरपूरात तीन लाचखोर पकडले

0
शिरपूर । दि.21 । प्रतिनिधी-सावेर ग्रामसेवक राहूल भिला रायसिंग याला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले तर निरीक्षक श्रीमती भारती विश्राम पावरा व खासगी इसम प्रदीप हिंमतराव पाटील या दोघांना तडजोडीअंती लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन लाच घेतल्यावरून पकडले.
तक्रारदार हे सावेर-गोदी ग्रामपंचायत, ता.शिरपूर अंतर्गत ग्रामरोजगार सेवक असून त्यांनी माहे सप्टेबर 2016 ते नोव्हेंबर 2016 दरम्यान सावेर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत कामे केलेली आहेत.
सदर कामाचे मानधन 17 हजार 394 रुपये तसेच मागील कामाचे सात हजार रुपये असे एकूण 24 हजार 374 शासनाकडून शिरपूर पंचायत समिती येथे आलेले होते.
त्यानंतर सदर मानधन पंचायत समितीमार्फत सावेर ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
सदर मानधनाचा धनादेश घेण्यासाठी तक्रारदार हे सावेरचे ग्रामसेवक राहूल भिला रायसिंग यांच्याकडे गेले असता त्यांनी तक्रारदाराकडे दहा टक्के खर्च लागेल, असे सांगितले होते, परंतु तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेवून दि.21 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला व रायसिंग याला दोन हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले.

याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या पथकाने केली.

 

दोघांना लाच घेतांना पकडले
तक्रारदार यांचे शिरपूर येथील चव्हाण कॉम्प्लेक्स, शाळा नं.2 मध्ये रेडिमेड नावाचे कापड दुकान आहे. तक्रारदार यांनी सन 2016 मध्ये शिरपूर येथील पप्पाजी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकान नं.7 चा गाळा भाड्याने घेवून सदर गाळ्यात नवीन कापड दुकान स्थलांतर केल्याने शॉपअ‍ॅक्ट लायसन्समध्ये व्यवसायाच्या पत्त्यातील बदल नोंदविण्यासाठी तक्रारदार यांनी 7 नोव्हेंबर 2016 रोजी शिरपूर दुकान निरीक्षक कार्यालयात जावून कार्यालयातील खासगी व्यक्ती प्रदीप पाटील याची भेट घेवून शॉपअ‍ॅक्ट लायसन्समधील धंद्याच्या ठिकाणाचा पत्त्यात बदल करण्याबाबत चौकशी केली असता त्याने मी दुकान निरीक्षक कार्यालयातील निरीक्षक श्रीमती भारती विश्राम पावरा यांच्या सांगण्यानुसार ऑनलाईन फॉर्म भरुन ठेवतो, परंतु निरीक्षक पावरा यांना 1200 रुपयांची लाच दिल्याशिवाय हे काम होणार नाही. त्यानंतर याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यात आली.

तक्रारीची दखल घेवून सापळा लावला असता भारती पावरा यांनी त्यांच्या कार्यालयात खासगी इसम प्रदीप हिंमतराव पाटील यांनी तक्रारदार यांच्या गायत्री रेडिमेड या कापड दुकानाचा शॉपअ‍ॅक्ट लायसन्सवरील पत्ता बदलण्यासाठी तडजोडीअंती लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरुन निष्पन्न झाल्याने पावरा व खासगी व्यक्ती प्रदीप पाटीलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*