शिंदखेडा शहर हगणदारीमुक्त !

0
शिंदखेडा । दि.1 । प्रतिनिधी-केंद्रशासनाच्या समितीने केलेल्या पाहणीनुसार शिंदखेडा शहर हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या समितीने ही घोषणा केली.
नगरपंचायत स्थापन झाल्यापासून नगराध्यक्ष, गटनेते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या महनतीला यश आले आहे.
याबाबत मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले की, नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर 2015 पासून स्वच्छ शहर महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरात सार्वजनिक आणि वैयक्ती शौचालयांच्या बांधकामावर विशेष भर देण्यात आला होता.

शहरामध्ये नागरिकांना हगणदारी मुक्तीची संकल्पना समजवून सुमारे 1250 लाभार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले.

यापैकी 850 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून शहराच्या विविध 13 सार्वजनिक शौचालयांमधून 225 सीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

केंद्रस्तरावरील विश्वजीतसिंग या अधिकार्‍यांच्या समितीने नुकतीच शहराची पाहणी केली होती. त्यांच्या अहवालानुसार शौचालयांचे काम उत्कृष्ट असल्याचे आढळून आले.

नागरिकांचा उघड्यावर शौचास करण्याचा वापर पूर्णपणे थांबल्याचे दिसून आले. 28 जून 2017 रोजी केंद्राच्या कॉलीटी कौन्सिल ऑफ इंडिया या त्रयस्त समितीने हा अहवाल दिला आहे.

शिंदखेडा हगणदारी मुक्त होण्यासाठी मुख्याधिकारी अजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता अभिजित मोहिते, आरोग्य विभागाचे कर्मचारी अशोक माळी, अबु हसन शेख, हुसेन मेहतर, वसीम मेहतर आणि गुडमॉर्निंग पथकाने परिश्रम घेतले.

त्यांना बांधकाम अभियंता ईश्वर सोनवणे, संगणक अभियंता सचिन पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश फुलपगारे, गणेश गावीत यांचे सहकार्य लाभले. शिंदखेडा हगणदारी मुक्त झाल्याने नगराध्यक्षा मथुराबाई मराठे, अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष उल्हासराव देशमुख, आरोग्य सभापती सुषमा चौधरी, प्राध्यापक सुरेश देसले, दिपक देसले आदिंनी समाधान व्यक्त केले आहे.

नगरपंचायत स्थापन झाल्यापासून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्यासोबतच राज्य आणि केंद्र स्थरावर हगणदारी मुक्तीचा बहुमान मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*