शाहीर परिषदेचे साक्री पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

0
धुळे । दि.20 । प्रतिनिधी-अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, ता.साक्री व जिल्ह्यातील शाहीर कलावंत, साहित्यिक, कवी, लेखक, तमाशा कलावंत, वारकरी संप्रदाय (भजनी मंडळ) एकतारी, भारुड, लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंग्रीवाला व सर्व स्थानिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील कलावंतांचे विविध प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी साक्री पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात सर्व कलावंतांनी आपले गार्‍हाणे आणि समस्या, कलेच्या साहित्यासह सादरीकरण करुन यावेळी मांडल्या. या आंदोलनाला जिल्हा शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाहीर गंभीरराव बोरसे, आप्पा खताळ, श्रावण वाझी, भटू गिरमकर, माणिकराव शिंदे, मंडाताई माळी, शोभा खैरनार, शंकरराव पवार आदिंनी मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व क्षेत्रातील कलावंत, शाहीर परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह 400 कलावंत उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष अनिल जगताप यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना, व्यसनमुक्ती, दारुबंदी, घर तेथे शौचालय, पाणी अडवा पाणी जिरवा, हुंडाबंदी, बेटी बचाव आदी विषयांवर सुमारे जनप्रबोधन केले. या आंदोलनामध्ये भजन, कीर्तन त्याचप्रमाणे गवळण, अभंग, लोकगिते, लोककला, भारुड आदी सादर करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सदर आंदोलन हे कला सादीकरणाच्या माध्यमातून सुरु होते. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, साक्री यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

सदर मागण्यांबाबत स्थानिक व जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी गांभीर्याने लोक कलावंतांच्या समस्यांकडे लक्ष न घातल्यास भविष्यात जि.प. कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अनिल जगताप यांनी दिला.

या आंदोलनामध्ये साक्री तालुक्यासह, शिंदखेडा, शिरपूर, धुळेसह नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांनी सहभाग घेतला होता.

शासकीय मानधनात वाढ झाली पाहिजे जिल्हास्तरावर कलावंतांचे 300 प्रस्ताव मंजूर झाले पाहिजे, मागील तीन वर्षांचे वृध्द कलावंतांच्या प्रस्तावांची त्वरित छाननी करून तात्काळ मंजूर झाले पाहिजे.

वृध्द कलावंत मानधन प्रस्तावाच्या वयोमर्यादेत 40 वर्ष वयापर्यंत शिथितला असावाी, वृध्द कलावंतांच्या मुलांना शिक्षणात 100 टक्के फी माफ झाली पाहिजे, आजारी वृध्द कलावंतांना मोफत शासकीय वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे.

एस.टी. व रेल्वे प्रवास भाड्यात 75 टक्के सुट मिळाली पाहिजे, कलावंतांच्या मुलांना नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे, तालुकास्तरावर कलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे लोककल्याणकारी कार्यक्रम मानधन तत्वावर मिळाले पाहिजे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*