जातीयतेची किड नष्ट होण्याची गरज

0
धुळे । दि.26 । प्रतिनिधी-शोषित लोकांकडून जातीच्या आधारावर इतरांचे शोषण करण्याची परंपरा आजही सुरु आहे. यामुळे जाती व्यवस्थेला खतपाणी घातले जात असून जातीयतेची ही किड नष्ट होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी केले. बामसेफच्या जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी श्री.भगत बोलत होते.
येथील गरुड वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड.संजय बाविस्कर, प्रा.सतिष निकम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुलनिवासी संघाचे राज्य सदस्य अ‍ॅड.राहुल वाघ होते. दोन सत्रात झालेल्या या अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना श्री.भगत म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीनिर्मुलनासाठी आयुष्यभर काम केले. तेच काम बामसेफच्या माध्यमातून होत आहे.

आंतरजातीय विवाहाच्या कारणावरून आजही ऑनरकिलींगचे प्रकार घडतात. यावरुन जातीयवाद्यांची अशा प्रकाराने मुकसंमती असल्याचे दिसते.

पृथ्वी ईश्वराने निर्माण केली असे लोक म्हणतात. मग नकाशे कशामुळे निर्माण झाले, सिमारेषा कुठून आल्या असा प्रश्न श्री.भगत यांनी उपस्थित केला.

जातीसाठी माती खाणारे लोक जातींमध्ये वाद लावतात. जोपर्यंत जातीयता बदलाचे नियम सापडत नाही तोपर्यंत जातीभेद संपणार नाही, असेही भगत म्हणाले.

यावेळी अ‍ॅड.बाविस्कर आणि निकम यांनीही विचार मांडले. दुपारच्या सत्रात चार गटांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर गटप्रमुखांनी आपली मते व्यासपीठावर मांडली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रणाली मराठे होते. आभार मोहन मोरे यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*