Type to search

धुळे राजकीय

विरोधकांचे पहेलवान निवडणूक पुर्वीच चितपट

Share

साक्री/ शिरपूर । विधानसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युती विकासाचा मुद्दा हाती घेऊन मैदानात उतरल्याने आघाडीची दानादान झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांचे पहेलवान निवडणूक पुर्वीच चितपट झाले आहेत. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
साक्रीत युतीचे उमेदवार इंजि. मोहन सुर्यवंशी व शिरपूर येथे युतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश करून युतीला बळ दिले आहे. पेसामधुन वगळण्यात आलेली गावे आणि पाडे राज्यपालांच्या अधिसुचनेनंतर पेसामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. पांझराकान कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी यांची दैना झाली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार निर्मिती करून तालुक्याचे वैभव असलेल्या पांझराकानला नव संजीवनी देऊन सुरू करणारच आहे. शाश्वत सिंचन योजना तालुक्यात राबवून लाटीपाडा जामखेली मालनगाव या धरणांचे पाणी शेतकर्‍यांच्या बांधापर्यत पोहचवून सुजलाम, सुफलाम केले जाईल. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्र घडवला जाईल असे त्यांनी सांगितले.

शिरपूरात सभा- तालुक्यातील प्रभावी नेते, पाणी, शिक्षण, उद्योग सर्वच क्षेत्रात प्रभावी व अभूतपूर्व काम केलेले तसेच लोहपुरुष सरदार पटेल यांच्या घराण्यातील प्रभावी व्यक्तिमत्त्व अमरिशभाई पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशवासीय खूश आहेत. अमरिशभाई भाजपामध्ये यावेत अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. त्यांनी केलेले शिरपूर पॅटर्नचे काम सर्वांना दिशा देणारे आहे. त्यांच्या शिरपूर पॅटर्नमुळेच्या धर्तीवर दुष्काळ मुक्तीसाठी जलयुक्त शिवार योजना आम्ही शासनामार्फत सुरू केली. अमरिशभाई पटेल यांनी आधीच तालुक्यात खूप काम केले आहे. ते खरे विकासपुरुष आहेत. अमरिशभाई तुम्ही स्वतःच्या भरवशावर अनेक वर्षे विकास केला. आता तुमच्या विकासकामांना भाजपचे डबल इंजिन लावू. दोनच वर्षात शिरपूर तालुक्याच्या सर्व मागण्यापूर्ण करण्यात येतील. महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळणार आहे. महाराष्ट शासनाने गोरगरीब, अल्पसंख्याक, सर्वांचे मनापासून काम केले. शेतकरी व सर्वांना न्याय दिला. कर्जमाफीच्या माध्यमातून मदत केली. आदिवासी बांधवांना मदत केली. दुष्काळ परिस्थितीत मदत केली. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविली. शेततळे, विहिरी व अनेक सुविधांमधून शेतकरी बांधवांना मदत केली. खान्देशातील अनेक प्रकल्पांना निधी दिला. हजारो कोटींचे रस्ते, महामार्ग केले. मनमाड इंदूर रेल्वे मार्ग काम सुरू आहे. हजारोंच्या संख्येने घरकुल निर्मिती केली. अतिक्रमणे नियमित करून कामे केली. झोपडपट्टींचे रुपांतर चांगल्या घरात केले असे त्यांनी सांगितले.

शाईचा फुगा फेकला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्री येथील सभेला भाडणे शिवारात हेलीपँड तयार करण्यात आले होते. मुख्यमंत्री दुपारी 4.40 वाजता हेलीपँडवरून सभास्थळी येत असतांना भाडणे फाटयावर मनसेचे पदाधिकारी धिरज देसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर शाईचा फुगा फेकण्याचा प्रयत्न केला असता डीवायएसपी श्रीकांत घुमरे आणि त्यांच्या पथकाने त्वरित दक्षता घेवून धिरज देसलेची धरपकड केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!