पेट्रोल पंप सतत बंद : वाहन चालकांचे हाल

0
साक्री । दि.23 । प्रतिनिधी-शहरातील बी. पी. जैन हा पेट्रोल पंप सतत काही ना काही कारणास्तव बंद पडत असल्याने येथील नागरिकांची नेहमीच गैरसोय होत असते.
पेट्रोल पंप चालकांनी या समस्येची सोडवणूक करून पेट्रोल पंप नियमित सुरु ठेवावा अशी मागणी दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही वाहन चालकांकडून देण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जैन पेट्रोल पंप हा दि 22 रोजी बंद असल्याने वाहन चालकांची गैरसोय होतांना दिसून येत होती.
कधी पेट्रोल मशीन खराब असते तर कधी पेट्रोल संपलेले असते. अशा विविध कारणांनी दर आठवड्याला हा जैन पेट्रोल पंप बंद पडत असल्याची माहिती नागरिकांकडून दै. देशदूतला देण्यात आली.

याविषयी पेट्रोल पंप चालक पेट्रोल शिल्लक नाही असे बोर्ड लावून मोकळे होतात परंतु यामुळे शहरातील नागरिकांचे अतोनात हाल होतात.

शहरातील जैन पेट्रोल पंप हा एकमेव असल्याने याठिकाणी जर पेट्रोल मिळाले नाही तर वाहन चालकांना वाहन ढकलत 4 ते 5 किलोमीटरवर असलेल्या दुसर्‍या पेट्रोल पंपावर जावे लागते.

या विनाकारण होत असलेल्या त्रासाला शहरातील महिला व पुरुष वाहन चालक कंटाळले असून पेट्रोल पंप चालकांनी या संदर्भात गंभीर दखल घेवून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा नियमित सुरु करावा अन्यथा वाहन चालकांकडून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज पहाटेपासून जैन पेट्रोल पंप बंद असल्याने बाहेरगावी जाणारे वाहन चालक, मुलांना शाळेत सोडणारे पालक, सरकारी कर्मचारी व व्यापारी वर्ग या सर्वांना आपापल्या दैनंदिन कामांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

काही वाहन चालक गाडीत पेट्रोल शिल्लक नसल्याने पेट्रोल पंपावरच आपले वाहन उभे करून दुसर्‍याच्या वाहनावर आपल्या कामासाठी निघून जात होते.

दुपारपर्यंत पेट्रोल पंप बंद असल्याने अनेक वाहन चालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. काही वाहन चालक आपला रोष व्यक्त करून निघून जात होते तर काही पेट्रोल मिळेल या आशेने त्याचठिकाणी थांबून होते. यावेळी दै देशदूतने वाहन चालकांशी संवाद साधल्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिल्या.

यासंदर्भात पेट्रोल पंप व्यवस्थापकास संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. परंतु कंपनी अधिकारींशी संपर्क साधण्यात आल्यावर माहिती मिळाली.

 

LEAVE A REPLY

*