‘सचिन’ चित्रपटाला चिमुकल्यांचा उदंड प्रतिसाद

0
धुळे । दि.15 । प्रतिनिधी – सचिन…सचिनचा जयघोष करीत चिमुकल्यांनी आज मास्टर ब्लास्टर सचिनच्या जीवन कार्यावर आधारीत ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला.
दै. देशदूततर्फे शिंदखेडा येथे आज सचिन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील अशोक सिनेप्लेक्समध्ये सकाळी 9.30 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ.मथुराबाई नामदेव मराठे, उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, शिंदखेड्याचे माजी सरपंच अनिल वानखेडे, वर्शी ता.शिंदखेडा येथील सप्तर्षी इंग्लिश मेडियम स्कूलचे चेअरमन डी.आर.पाटील, व्ही.के.इंटरनॅशनल स्कूलचे संचालक व्ही.के.पाटील, माधुरी पाटील, पोलीस निरिक्षक देवीदास भोज, दै.देशदूतचे संपादक हेमंत अलोने, धुळे कार्यालयाचे व्यवस्थापक सुनिल बहाळकर उपस्थित होते.

यावेळी दोंडाईचा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे सिनेमागृह ‘हाऊसफुल’ झाले होते.

क्रिकेटपटू सचिनच्या जीवनावरील घटना पडद्यावर पाहताना चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. जोश, जल्लोष केला जात होता.

सचिन, सचिन म्हणत सचिन तेंडूलकरचा जयघोष यावेळी चित्रपटगृहात घुमत होता. आज शाळा उघडल्या होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा प्रवेश झाला आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर या आवडत्या खेळाडूची जीवनकहाणी पाहण्याची संधीदेखील मिळाली.

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता. फक्त शालेय विद्यार्थ्यांनाच प्रवेश असल्याने आणि चित्रपटगृह ‘फुल्ल’ असल्याने आुगळ्यावेगळ्या वातावरणात चित्रपटाचा मनमुराद आनंद घेतला.

कधी टाळ्या तर कधी हात उंचावून सचिनचे कौतुक केले जात होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेले सचिनचे प्रचंड आकर्षण यानिमित्ताने पहायला मिळाले.

विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने थिटरमध्ये खाली बसूनही चिमुकल्यांनीही चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थीनींची संख्याही मोठी होती.

दै.देशदूतने आगळावेगळा उपक्रम घेवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी मनोहर भोजवानी, डॉ. रविंद्र देसले यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देशदूतचे मुख्य उपसंपादक विलास पवार, जाहीरात व्यवस्थापक कैलास सोनवणे, मार्केटींग अधिकारी नितीन कुलकर्णी, शिंदखेडा प्रतिनिधी प्रा. प्रदीप दिक्षीत, वितरण प्रतिनिधी नितीन ठाकरे, गणेश कापडणीस यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार कैलास सोनवणे यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*