सचिन ऽ ऽ सचिन हाऊसफुल्ल !

0
धुळे । दि.16 । प्रतिनिधी – सचिन तेंडूलकर…घरात वावरणारा आणि मैदानावर रमणारा….सचिन बालपणी खोड्या करणारा आणि भारताला वर्ल्डकपची भेट देणारा….सचिन आपल्या कुटूंबातील सर्वांचा आदर करणारा आणि मित्रांना जीव लावणारा…क्रिेकेट विश्वाचा देव…कोट्यवधी चाहत्यांचा क्रिकेटवीर…अशा या लाडक्या सचिनला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी दोंडाईचा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आज प्रचंड गर्दी केली होती.
मास्टर ब्लास्टर सचिनच्या जीवन कार्यावर आधारीत ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटाचा विद्यार्थ्यांनी यावेळी आंनद लुटला. सचिन…सचिनच्या घोषणांनी दोंडाईचातील अभिषेक चित्रपटगृह अक्षरक्ष: दणाणून गेले होते. सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता.
दै.देशदूततर्फे जिल्ह्यात सचिन चित्रपट महोत्सव सुरू आहे. आज दोंडाईचा येथील अभिषेक चित्रपटगृहात हा महोत्सव पार पडला.

महोत्सवाचे उदघाटन नगराध्यक्षा सौ.नयनकुवरताई रावल, उद्योगपती तथा माजी आ.बापूसाहेब रावल, हस्ती पब्लिक स्कूलचे चेअरमन कैलास जैन, तहसीलदार रोहिदास वारुडे, अभिषेक जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग प्रा.लि.चे संचालक रविंद्र उपाध्ये, हस्ती स्कूलचे प्राचार्य कुणाल पाटील, दै.देशदूतचे धुळे व्यवस्थापक सुनिल बहाळकर यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी दोंडाईचा शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. सिनेमागृह ‘हाऊसफुल’ झाले होते.

क्रिकेटपटू सचिनच्या जीवनावरील घटना पडद्यावर पाहताना चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होताच मात्र टाळ्या आणि शिट्यांचाही पाऊस पडत होता. सचिन, सचिन म्हणत सचिन तेंडूलकरचा जयघोष यावेळी केला जात होता.

आपल्या आवडत्या सचिनची जीवनकहाणी पाहतांना विद्यार्थ्यांनी कधी जल्लोष केला तर कधी भावनिकही झाले. दै.देशदूत आगळावेगळा उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारी पार पाडत असतो, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी बापूसाहेब रावल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठे झाल्यावर सचिनसारखे कर्तृत्व करून दाखवा, अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देशदूतचे मुख्य उपसंपादक विलास पवार, जाहीरात व्यवस्थापक कैलास सोनवणे, मार्केटींग अधिकारी नितीन कुलकर्णी, दोंडाईचा प्रतिनिधी दिनेश ठाकरे, वितरण प्रतिनिधी नितीन ठाकरे, गोपाळ कापडणीस यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन कैलास सोनवणे यांनी केले.

 

कैलास जैन रमले आठवणींमध्ये
बालपणापासून क्रिकेटची आवड असलेले हस्ती पब्लिक स्कुलचे चेअरमन कैलास जैन यांनी सचिन चित्रपटासाठी विद्यार्थ्यांसमवेत पुर्णवेळ हजेरी लावली. आपल्याच शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत चित्रपट पाहण्याचा आनंद त्यांनी घेतला. याचवेळी त्यांची सुकन्या कानन जैननेदेखील चित्रपटाचा आनंद घेतला. सचिनचे अनेक सामने आयुष्यात पाहीले असल्याने हा चित्रपट पाहतांना पुर्वी पाहीलेल्या सामन्यांविषयी त्यांच्या आठवणी जागे झाल्या. सचिन क्रिकेटमधून निवृत्ती घेतो, त्यावेळचे दृष्य पडद्यावर पाहताना कैलास जैन भावनिक झाले होते.

बापूसाहेबांनी लुटला मनमुराद आनंद!
उद्योगपती तथा माजी आ.बापूसाहेब रावल यांनी खूप वर्षांनंतर चित्रपटगृहात हजेरी लावून तब्बल तीन तास सचिन चित्रपटासाठी दिले. सचिनची जिवनकहाणी मोठ्या पडडद्यावर पाहताना बापूसाहेब तल्लीन झाले होते. चित्रपटासाठी ते बालगोपाळांमध्येच बसले. सचिनसाठी चिमुकल्यांच्या टाळ्या पडत होत्या, शिट्या वाजविल्या जात होत्या.त्याचवेळी पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांचा सुपूत्र चि.जयआदितसिंह रावल यानेही बापूसाहेबांशेजारी बसून तेंडूलकरच्या जीवन कहाणीचा आनंद घेतला. खुप दिवसांनी चित्रपट गृहात एका नामवंत खेळाडूवर आधारीत चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल बापूसाहेबांनी आनंद व्यक्त केला. लहान मुलांना संस्कारशिल चित्रपटांची गरज आहे.सचिन तेंडूलकर याने आपल्या जगण्यातून आणि खेळातून भारताचा नावलौकीक वाढविला. त्यामुळेच सचिन आज प्रत्येकाच्या हृदयात आहे. सचिनचे सर्वांनाच आकर्षण आहे, आज शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना सचिनला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी देशदूतच्या या उपक्रमातून मिळाल्याचे बापूसाहेब म्हणाले.

 

LEAVE A REPLY

*