Wednesday, May 8, 2024
Homeधुळेपोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

लालबहादूर शास्त्रीनगरातील घटना : रोख रकमेसह सव्वातीन लाख लंपास

धुळे –

शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. चोरट्यांनी पुन्हा पोलिस कर्मचार्‍याकडे घरफोडी  पोलिसांना आव्हान दिले आहे. लालबहाद्दुर शास्त्री नगरातील पोलिसा कर्मचार्‍याच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह 3 लाख 25 हजारांचा मुद्येमाल लंपास केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील नवजीवन ब्लड बँकेच्या मागे लालबहाद्दुर शास्त्री नगरातील प्लॉट क्र. 26/27 मध्ये संजय दादाभाई ठाकुर (वय 43) हे राहतात. ते शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे देवपूरात राहणारे मेहुणे किरणकुमार अहिरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यामुळे संजय ठाकुर हे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह त्याकडे राहत असल्यामुळे त्यांचे घर बंद होते.

ही संधी साधत काल दि. 4 ते 5 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले उसनवारीचे 1 लाख 20 हजार व आईच्या पेन्शनचे 40 हजार असे एकुण 1 लाख 60 हजार रूपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 3 लाख 25 हजारांचा ऐजव चोरून नेला.

आज सायंकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संजय ठाकुर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शिवानंद कॉलनीत घरफोडी

शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगरातील शिवानंद कॉलनीतील शेतकर्‍यांचे बंद घर  फोडून चोरट्यांनी 74 हजारांचा मुद्येमाल लांबविला.

याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवानंद कॉलनीत प्लॉट नं. 8 मध्ये सुरेश नथ्थु हिरे हे राहतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 10 हजार रूपये किंमतीचा टीव्ही, 4 हजार रूपये किंमतीची देवाची मुर्ती, पितळी भांडे असा 74 हजार रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला.

सुरेश हिरे घर परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत मोहाडी पोलिसात माहिती देण्यात आली.  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथकाला बोलविण्यात आले. परंतू श्वानला माग गवसला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या