धुळ्यात नरेंद्र मोदींच्या सभेची जय्यत तयारी

ना.डॉ.भामरेंसह अधिकार्‍यांनी केली पाहणी

0
धुळे । जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आणि सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि.16 फेबु्रवारी रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी 2.30 वाजेता मुंबई-आग्रा महामार्गालगत मालेगाव रोडवरील गोशाळेच्या खुल्या मैदानात सभा होणार आहे.

या नियोजित सभास्थळी हेलीपॅड निर्मिती करण्यात येणार असून त्या जागेची आज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी पाहणी केली.

पंतप्रधान यांच्या दौर्‍यामुळे केंद्र आणि राज्याची गुप्तचर यंत्रणा, जिल्हा पोलीस प्रशासन तसेच भारतीय जनता पार्टी तयारीला लागले आहे. महापालिकेने नियोजित सभा स्थळ स्वच्छतेच्या कामास सुरुवात केली आहे. सभास्थळी हेलीपॅड निर्मिती करण्यात येणार आहे.

जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न असलेल्या मनमाड- इंदूर रेल्वे मार्ग आणि सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांचे सभास्थळी हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. त्यासाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात येत आहे. सभास्थळी लाखोंचा जनसमुदाय येण्याची शक्यता असल्यान वाहतूक व्यवस्थेसह पार्किंग व्यवस्था, सुरक्षेचे उपाय चोख केले जात आहे. पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात येत आहे. सभास्थळी स्वच्छतेचे काम वेगाने सुरु आहे. या सर्व कामाची आज दि.12 रोजी दुपारी पाहणी करण्यात आली. यावेळी ना.डॉ.सुभाष भामरे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, नगरसेवक शीतल नवले, संतोष खताळ, नागसेन बोरसे, हर्ष रेलन, देवेंद्र सोनार, संजय पाटील, युवराज पाटील, नंदू सोनार, भगवान गवळी, प्रदीप कर्पे तसेच भाजपा पदाधिकारी गजेंद्र अंपळकर, भिकन वराडे आदी उपस्थित होते.

सभास्थळी स्वच्छता सुरु
महापालिकेच्या शिवछत्रपती महास्वच्छता अभियानांतर्गत गोशाळेच्या खुल्या जागेसह परिसरात स्वच्छता करण्यात येत आहे. यात दसेरा मैदानावरील जलकुंभापासून गुरुद्वारापर्यंत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे 500 कर्मचारी या महास्वच्छता अभियानात सहभागी झाले. यात 14 ट्रॅक्टर, तीन जेसीबी, पथदिवे दुरुस्तीसाठी कर्मचार्‍यांची 5 पथके कार्यरत होती. मलेरिया विभागातर्फे आठ फॉगिंग मशिनद्वारे धुरळणी, अ‍ॅबेटींग करण्यात आली. प्रमुख मार्गावरील झाडांना रंग दिला जात आहे. पाणीपुरवठा विभागातर्फे ठिकठिकाणी गळती रोखण्याचे काम केले जात आहे. मोहिमेत 11 पथदिव्यांची दुरुस्ती आली असून शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून 230 झाडांना रंगकाम झाल्याची माहिती महापौर चंद्रकांत सोनार यांनी दिली.

LEAVE A REPLY

*