Type to search

धुळे

नऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप

Share

सुभाष जगताप
पिंपळनेर । पिंपळनेर उपबाजार समितीत लिलाव झालेल्या कांद्यांचे पैसे गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांना आज दि. 18 जून रोजी पिंपळनेर उपबाजार समितीला कुलूप ठोकले. याबाबत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

पिंपळनेर उपबाजार समितीत नऊ ते दहा महिन्यापुर्वी शेतकर्‍यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावात बिजासनी ट्रेडींग कंपनीने अनेक शेतकर्‍यांचा कांदा खरेदी करुन पेमेंटसाठी धनादेश दिला. शेतकर्‍यांनी सदर धनादेश वटविण्यासाठी बँकेत टाकला असता धनादेश अनादर झाला. त्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाही. या संदर्भात संतप्त शेतकर्‍यांनी संबंधित व्यापार्‍याविरोधात पिंपळनेर बाजार समितीला निवेदन दिले. शेतकर्‍यांनी वेळोवेळी बाजार समितीत पेमेंटसाठी फेर्‍या मारल्या. परंतु मार्केट प्रशासनाकडून व व्यापार्‍याकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळाली. नऊ महिने उलटूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. आज दि. 18 जून रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास शेतकर्‍यांनी पैसे मिळवून द्या अशी आर्त हाक दिली. परंतु त्याची दखल सभापती, सचिव, शाखाप्रमुख, संचालक मंडळाने घेतली नाही. संचालक गजेंद्र कोतकर यांना दूरध्वनी करुनही ते घटनास्थळी आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी बाजार समितीला कुलूप ठोकले. त्यानंतर सभापती पोपटराव सोनवणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन शेतकर्‍यांनी संपर्क केला. त्यांनी हात झटकत ही आमची जबाबदारी नाही. तुम्ही संबंधित व्यापार्‍याशी संपर्क करा धनादेश बॉऊन्स झाल्यावर पोलिसात तक्रार द्यायची असते. त्यामुळे शेतकरी हे संतप्त झाले. त्यांनी कार्यालयातील खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली व निषेध व्यक्त केला.

सभापतींकडून शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्याने शेतकर्‍यांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून तेथे कैफियत मांडली.

कांदा लिलावासाठी आलेली सर्व वाहने बाजार समितीचे गेट बंद असल्यामुळे बाहेर रस्त्यावर उभी होती. एका बाजूला बाजार समितीचे प्रशासन शेतकर्‍यांना कांदा विक्रीसाठी आणावा, पैशांचे संरक्षण आम्ही देवू असे आवाहन करीत होते. परंतु बाजार समितीत व सभापती दखल घेत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी मार्केटला माल विक्रीसाठी का आणावा? बाहेरच विक्री का करु नये? असे प्रश्न उपस्थित केले. या आंदोलनात शांताराम बिरारीस, अनिल कुवर, जिभाऊ बोरसे, भिलाजी पाटील, अविनाश पाटील, जितेंद्र बिरारीस, चेतन बिरारीस, दीपक बिरारीस, प्रकाश बिरारीस, अनिल गांगुर्डे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याच्या पावित्र्यात शेतकरी आहेत.

पैसे न मिळाल्याने शेतकरी तक्रार देण्यासाठी पिंपळनेर पोलिस ठाण्यात गेले होते. तेथे सपोनि पंजाबराव राठोड यांनी शेतकर्‍यांनी तक्रार ऐकूण घेतली व सर्व शेतकर्‍यांनी एकत्रित येवून तक्रार द्यावी असे यावेळी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!