Type to search

आमदारांच्या गाडीची धडक, दोघे भाऊ ठार

maharashtra धुळे मुख्य बातम्या

आमदारांच्या गाडीची धडक, दोघे भाऊ ठार

Share
पिंपळनेर । वार्ताहर- पिंपळनेर-साक्री रस्त्यावर नवडणे फाट्याजवळ मलांजणच्या दोघा सख्या भावांना आ. डी.एस.अहिरेंच्या इनोव्हा
गाडीने जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही भाऊ ठार झाले. घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

आज दि. 19 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पिंपळनेर-साक्री रस्त्यावर नवडणे फाट्याच्या पश्चिमेस शंभर मीटर अंतरावर ही घटना घडली. मलांजन येथील शांताराम दयाराम सोनवणे (वय 50) व सोनू दयाराम सोनवणे (वय 55) हे दोघे भाऊ टेंभे तळवाडे येथून लग्न आटोपून घरी मलांजनकडे दुचाकीने (एमएच-18/एबी 1606) जात होते. रस्त्यात त्यांनी मुलांसाठी खाऊ व टरबुज घेतले होते. त्याचवेळेला पिंपळनेरकडून साक्रीकडे आमदार डी.एस.अहिरे यांची इनोव्हा गाडीने(एमएच-18/एपी-565) राँग साईडने भरधाव वेगात जावून त्यांच्या दुचाकीला रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात 25 फुट अंतरापर्यंत खेचत नेले. त्यात दुचाकी चालविणारे शांताराम सोनवणे हे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी सोनू सोनवणे यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषीत केले. घटनास्थळी शेनपूर-मलांजन येथील नागरीक मोठ्या संख्येने गोळा झाले. काही काळ रस्त्यावर तणाव, संतापाचे वातावरणामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

घटनास्थळी डीवायएसपी श्री.घुमरे हे पोलीस कर्मचार्‍यांसह दाखल झाले होते. यावेळी आ. डी.एस. आहिरेंची गाडी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढताच जनतेचा आक्रोश वाढला व गाडीच्या व मृताचा पंचनामा झाला नाही, तोवर गाडी बाहेर का काढतात? म्हणून पोलिसात व जनतेत वाद निर्माण झाला. गाडी पुन्हा खड्ड्यात टाका नाहीतर गाडी पेटवून देण्यात येईल, असे संतप्त नागरीक म्हणत होते. दोन भाऊ ठार झाले आणि तुम्हाला आमदारच्या गाडीची पडली का? असे म्हणत नागरिक संतप्त झाले. त्यामुळे क्रेनव्दारे पुन्हा आ. डी.एस. आहिरेंची गाडी खड्ड्यात टाकण्यात आली.

आमदारांची गाडी 70 ते 80च्या स्पीडने असावी. कारण अपघात होताच गाडीतील एअर बॅगा उघडल्या गेल्या होत्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत घटनास्थळावर नागरीक व नातेवाईकांनी गर्दी केली होती. साक्री ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. पुढील तपास पीआय डी. के. ढुमणे करीत आहेत.

ग्रामस्थांचा रास्तारोको गुन्हा दाखल करण्याची मागणी
साक्री – अपघातानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास साक्री शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर मलांजन येथील रहिवाशांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. रास्तारोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलीस निरीक्षक देविदास डुमणे यांनी नातेवाईक आणि ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना न जुमानता रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!