पीआरसीकडून गटशिक्षणाधिकार्‍यांची खरडपट्टी

0
रामकृष्ण पाटील,कापडणे । दि.6-तालुक्याच्या महत्वाच्या पदावर आपण एक महिला अधिकारी म्हणुन कार्यरत असतांनाही विद्यार्थ्यांनींच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लंक्ष होतेच कसे? असा सवाल करीत पंचायत राज समितीने धुळे गट शिक्षणाधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
येथील जि.प. शाळेतल्या स्वच्छतागृृहांची वाईट अवस्था व मुलभूत प्रश्नांकडे झालेले अक्षम्य दुर्लंक्ष पाहुन संतप्त झालेल्या पीआरसी सदस्यांनी धुळे गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांना तात्काळ सुधारणा करण्याची तंबी दिली.
यावेळी समिती सदस्यांनी मध्यांन्ह भोजन योजनेशी सबंधित बाबी तसेच शाळेचा परिसर व इमारतीची माहिती घेतली. आता गट शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांच्यावर समिती कार्यवाहीचा काय बडगा उगारते? याकडे परिसराचे लक्ष लागुन आहे.
पंचायत राज समितीने आज(दि.6) येथे भेट दिली. येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर बैठक घेण्यात आली.

यावेळी येथील पाणीपुरवठा योजना, गावातील शोषखड्डे, ग्रा.पं.चे गहाळ दप्तर व दप्तराअभावी न झालेले ऑडिट, ग्रा.पं.च्या जागा आदीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी समिती सदस्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कापडणे गाव दोन महिन्यात हागंदारीमुक्त करण्याचा निर्धार यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी.यांनी व्यक्त केला.

येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीस पंचायत राज समितीचे कार्यकारी समिती प्रमुख आ.प्रकाश भारसाकळे, आ.हेमंत पाटील, आ.अनिल तटकरे, आ. विकास कुंभारे, उप सचिव विलास आठवले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., आरोग्य व शिक्षण सभापती नुतन पाटील, शिक्षणाधिकारी मोहन देसले, ग्रा.पं.चे गटनेते भगवान पाटील, माजी जि.प.सदस्य बापु खलाणे, पं.स.सदस्य उषाबाई पाटील, सरपंच भटु पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवल पाटील, उपसरपंच प्रभाकर बोरसे, सदस्य भटु पाटील, अमोल पाटील, मनोज पाटील, प्रमोद पाटील, भैय्या पाटील, महेंद्र भामरे, भैय्या बोरसे, राजेंद्र माळी, सुमित माळी, ग्रामविकास अधिकारी आर.एन.कुंवर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंचायत राज समितीने आज(दि.6) येथे भेट देत बैठक घेतली. समितीने गावात आल्याबरोबर येथील जि.प. शाळा क्र.1 व 2 ला भेट दिली. यावेळी इमारतीची व स्वच्छतागृहांची वाईट अवस्था पाहून समिती सदस्य आ.हेमंत पाटील व आ.भारसाकळे यांनी केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली.

पोषण आहार योजनेतही सुसूत्रता आणण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकित विविध रजिष्टर तपासण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

यात पाणीपुरवठा योजनेची चौकशी करणे, गावातील शोषखड्डयांबाबत कारवाई करणे, ग्रा.पं.चे गहाळ दप्तर व दप्तराअभावी न झालेले ऑडिट, ग्रा.पं.च्या जागा आदीबाबत यावेळी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी चर्चेत भगवान पाटील, बापु खलाणे, जगन्नाथ पाटील, जयवंत बोरसे, जिजाबराव माळी आदींनी भाग घेतला.

समितीने यावेळी या पाणीयोजनेची माहिती समजुन घेतली व चौकशींचे निर्देश दिले. कापडणे गावास येत्या दोन महिन्यात हागंदारीमुक्त केले जाईल असा निर्धार यावेळी सीईओ गंगाथरण डी. यांनी व्यक्त केला.

सुत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले. धुळे गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील कार्यवाही व पाणीयोजनेच्या चौकशी याबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष आहे.

उद्या (दि.7 जुलै) रोजी सकाळपासून जिल्हा परिषदेच्या हॉलमध्ये 2012-13 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष होणार आहे

नांदेड मतदारसंघाचे आ. हेमंत पाटील हे मुळचे कापडणे गावचे. गावाविषयी त्यांना विशेष आपुलकी. कापडण्याच्या क्रांतीकारी भूमीत आ.पाटील यांचा नुकताच नागरी सत्कार झाला.

धुळे जिल्ह्यात आलेल्या पंचायत राज समितीत त्यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी आज कापडण्याला भेट दिली. यावेळीही त्यांची गावाविषयीची तळमळ व आपुलकी दिसुन येत होती. अधिकार्‍यांशी बोलतांना गावाविषयी आत्मियतेने बोलतांना पाहुन ग्रामस्थांना होणारे समाधान अवर्णनिय होते.

 

LEAVE A REPLY

*