Type to search

maharashtra धुळे

आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करा!

Share
धुळे । मतमोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई असून मतमोजणी करतांना सर्वांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे यांनी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना दिले.

धुळे लोकसभा मतदारसंघात दि.23 मे रोजी सकाळी 8 वाजेपासून नगावबारी येथील शासकीय धान्य गोदाम क्र.2 येथे मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी सुमारे 550 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पर्यवेक्षक, सहायक, शिपाई, सुक्ष्म निरीक्षक आदींचा समावेश आहे. मतमोजणीत पर्यवेक्षक व सहायक यांची महत्वाची भुमिका असल्याने त्यांना आज (दि.17) शहरातील राजर्षी शाहु महाराज नाट्यगृहात मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी भीमराज दराडे यांनी मतमोजणीची प्रक्रिया सविस्तर समजावून सांगीतली.

यावेळी धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे, शिंदखेडा विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण, मालेगाव (मध्य) विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मिसाळ, बागलाण विधासभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण महाजन उपस्थित होते. भीमराव दराडे म्हणाले की, सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यात सर्वात आधी टपाली मतदानाची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांची मतमोजणी केली जाईल. शेवटी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी 5 याप्रमाणे 30 व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाईल.

मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 20 या प्रमाणे एकूण 120 टेबल असतील. टपाली व इटीबीपीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे 10 व पाच टेबल असतील. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त असतील. मतमोजणीच्या एकूण 19 फेर्‍या होतील. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपापली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, मतमोजणी कक्षात सर्वांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल, असे सांगितले. यावेळी श्री.दराडे यांनी कर्मचार्‍यांना पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगीतली.

मतमोजणीची माहिती तक्त्यात कशी भरावी, कोणती दक्षता घ्यावी, पोस्टल मतदानाची नोंदणी कशी करावी, ईव्हीएमची नोंदणी कशी करावी, तसेच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी कशी करावी, या माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागात कर्मचार्‍यांना मतमोजणीची माहिती कशी भरावी, याबाबत डेमो साईटवर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. फेरीनिहाय मतमोजणीची माहिती भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा अ‍ॅपवर भरण्याबाबत देखील कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार संजय शिंदे, तहसीलदार किशोर कदम आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!