Type to search

maharashtra धुळे

दुष्काळावरील चर्चेला लस्सीचा उतारा!

Share
धुळे । तालुक्यासह संपुर्ण जिल्हा दुष्काळामुळे होरपळून निघाला आहे. तालुक्यातील मोरदडतांडा येथे पाण्याच्या शोधात असलेल्या एका मुलीचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाला. चारा-पाण्या अभावी जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे. पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे, अशी गंभीर स्थिती असतांना धुळे पंचायत समितीच्या मासिक सभेत मात्र सभापतींसह सदस्य, अधिकारी थंडगार लस्सी, आईस्क्रीवर ताव मारतांना पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दुष्काळावर थातूरमातूर चर्चा करून पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांनी सभा गुंडाळल्याचा आरोप होत आहे.

पंचायत समितीत आज सभापती सौ.अनिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपसभापती, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे तसेच अधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत तालुक्यातील दुष्काळीस्थिती, पाणी, चारा टंचाईचे नियोजन, मोरदड तांड्यातील दुर्देवी घटना, अशा गंभीर विषयांवर चर्चा गरजेचे होते. मात्र, सभेच्या सुरूवातीलाच कर्मचार्‍यांकडून पदाधिकारी व अधिकार्‍यांची सरबराई सुरू झाली. थंडगार पाणी, मलाईदार लस्सी, आईस्क्रीमवर ताव मारतच या बैठकीत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीतून काय निष्पन्न झाले? याची माहिती मिळू शकली नाही.

पत्रकारांना मनाई, सभापतीच्या पतींना प्रवेश
मासिक सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार व छायाचित्रकार पंचायत समितीत दाखल झाले. मात्र, सभापतींनी पत्रकार व छायाचित्रकार यांना सभागृहात येण्यास मज्जाव केला. पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारणार्‍या सभापतींच्या पतीराजांना मात्र, प्रवेश देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. मासिक सभेला लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनाच प्रवेश असले तर सभापतींचे पती आत कसे बसले? पतीराज यांची ही ढवळाढवळ कायदेशीर आहे काय? नसेल तर संबंधीत लोकप्रतिनिधीचे पद धोक्यात येवू शकते काय? अधिकारी सभापतींच्या पतीची अशी बेकायदेशीर उपस्थिती कडे दुर्लेक्ष करतातच कसे? की सभापतींच्या पतींचा कामातील हस्तक्षेप त्यांना नित्याचाच झाला आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!