Type to search

धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

maharashtra धुळे मुख्य बातम्या राजकीय

धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Share
धुळे । धुळे लोकसभा मतदार संघात शहरातील नगावबारी परिसरातील शासकीय गोदामात दि. 23 मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुक आयोगाच्या आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

धुळे लोकसभा मतदार संघात दि. 29 एप्रिल रोजी निवडणुक झाली. 56.68 टक्के मतदान झाले. या मतदार संघात 28 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे. दि. 23 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होईल. यात सुरूवातीला टपाली मतपत्रिकांची मतमोजणी होणार आहे. तथापी टपाली मतपत्रिकांचा ओघ सुरूच असून दि. 23 मे रोजी सकाळी 7.59 मि.पर्यंत टपाली मतपत्रिका स्वीकारल्या जाणार आहेत. आतापर्यंत पाच हजार टपाली मतपत्रिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून कर्मचार्‍यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीसाठी लागणारे टेबल, कर्मचार्‍यांची संख्या, सुरक्षा व्यवस्था याबाबत निेयोजन पुर्ण करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्ती केलेल्या कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्रेही देण्यात आली आहेत. याच आठवड्यात कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र शहरातील नगावबारी येथील शासकीय गोदामातील स्ट्राँग रूममध्ये सील करून ठेवण्यात आली आहेत. यासाठी सीआरपीएफचे जवान, एसआरपीएफ, पोलिस कर्मचारी अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच या ठिकाणी आहे. निवडणुक अधिकारी राहुल रेखावार व निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे हे भेटी देवून आढावा घेत आहेत.

निवडणुक आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे अधिकार्‍यांना मतमोजणीबाबत सुचना दिल्या. तसेच मतमोजणीचे अपडेट सुविधा या मोबाईल अ‍ॅपवर पहायला मिळणार आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चिठ्ठ्यांची पडताळणी होणार!
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठयांची पडताळणी केली जाणार असून त्याप्रमाणे धुळे लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असल्याने यासाठी एकुण 30 व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठयांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे निकालास विलंब होण्यासाठी शक्यता आहे. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

मतमोजणीसाठी 120 टेबलांवर व्यवस्था
धुळे लोकसभा मतदार संघातील निवडणूकीची मतमोजणी शहरातील नगावबारी परिसरातील शासकीय गोदामात दि. 23 मे रोजी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय 20 टेबल राहणार आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असल्याने एकूण 120 टेबलांवर मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. तसेच प्रत्येक टेबलावर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक शिपाई व एक सुक्ष्मनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऐवेळी कोणतीही अडचण येवू नये म्हणून 25 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

खडा पहारा
शहरातील शासकीय गोदामात सुमारे आठ हजार चौरस फूट जागेत स्ट्राँग रुम तयार करण्यात आला असून त्यावर देखरेखीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वॉच देखीलआह.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!