Type to search

maharashtra धुळे

बंदी असलेल्या बियाण्यांची साठवणूक करु नका!

Share
धुळे । बंदी असलेल्या बियाण्यांची साठवणूक, विक्री करू नये. अशी बियाणे दुकानात बाळगणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करुन पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली आहे.

चोर बी. टी. अथवा आर. आर. बीटी या नावाने सर्वत्र परिचित असलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याचा व्यवसाय जिल्ह्यात खासगी व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी केंद्र तथा या व्यवसायातील ठोक विक्रेत्यांकडूनही शेतकर्‍यांना हे बियाणे दिले जात आहे. बंदी असलेल्या या बियाण्यांची साठवणूक करणे, विक्री करणे व दुकानात बाळगणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करुन पाच वर्षे शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

चोर बीटी अथवा आर. आर. बीटी या नावाने चोर बीटी बियाणे विकण्यास शासनाची मान्यता नसली, तरी हे बियाणे ग्लॉयफोसेट या तणनाशकाला प्रतिकारक्षम असल्याने शेतकरी याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येत आहे. या बियाण्याचे दीर्घकालीन दु:ष्परिणाम दिसून आले आहेत. ग्लायफोसेट तणनाशकाचा अधिक वापर केल्यास जैवविविधतेला बाधा येत असून जमीन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.

शेतामध्ये सततचा तणनाशकाचा वापर केल्यास कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही. या चोर बीटीमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रतिकार करणार्‍या जीनची उपलब्धता विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंडअळीला हमखास बळी पडून त्याचा परिणाम इतर कापूस पिकांवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या बियाण्यांची विक्री साठवणूक अथवा खरेदी करण्यात येऊ नये. यासाठी कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी या बियाण्यांची पेरणी त्यांच्या शेतात केल्यास व पेरणी पश्चात कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याची दखल प्रशासनातर्फे घेतली जाणार नाही.

या बियाण्याला अधिकृत मान्यता नसल्यामुळे हे बियाणे बाळगणे, साठा करणे, विक्री करणे इत्यादींवर बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईला पात्र आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी याप्रकारच्या कोणत्याही खोट्या अमिषाला बळी पडून अनधिकृत कापूस बियाण्याची शेतात लागवड करु नये. तसेच कोणी छुप्या पध्दतीने या बियाण्यांचा व्यवसाय करत असल्यास त्याची माहिती त्वरित मनोजकुमार शिसोदे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोजकुमार शिसोदे यांना अथवा संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांना द्यावी, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी केलेे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!